ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सम-विषम क्रमांकानुसार वाहने रस्त्यावर आणण्याच्या योजनेतून 'व्हीआयपीं'ना वगळण्याचा 'आम आदमी पक्षाचा' निर्णय म्हणजे ढोंगीपणा आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई व प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी केली आहे. फेसबूक या सोशल नेटवर्किंग साईटवरील पोस्टद्वारे वाड्रा यांनी 'आप'वर निशाणा साधला.
' सम आणि विषम मार्ग! अपवादाची समान यादी बनवणे हा ढोंगीपणा आहे. जर हा कायदा जनहितासाठी लागू करण्यात येत असेल तर व्हीआयपींनीही या कायद्याचे पालन केले पाहिजे‘ असे वाड्रा यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे.
येत्या १ जानेवारीपासून दिल्लीत सम व विषम क्रमांकाची वाहने सम-विषम तारखेप्रमाणे म्हणजेच एक दिवसाआड रस्त्यांवर धावू शकतील, सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत हा नियम लागू असेल व तो मोडल्यास २ हजार रुपयांता दंड ठोठावण्यात येईल. मात्र रविवारी हा नियम लागू नसेल. तसेच राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, राज्यांचे राज्यपाल, केंद्रीय मंत्री, लोकसभा व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि लोकायुक्त या व्हीआयपींसह रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या आदींना या सम-विषम नियमातून वगळण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले होते.