संदीप आडनाईक, पणजीआॅस्कर आणि ग्रॅमी पुरस्कार सन्मानित संगीत दिग्दर्शक ए.आर. रेहमान यांनी मंगळवारी असहिष्णुतेच्या वादात उडी घेत अभिनेता आमिर खानच्या वक्तव्याशी आपण सहमत असल्याचे सांगितले. ४६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपासाठी पणजीत आलेल्या रेहमान यांनी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या फिल्म बाजारमध्ये एका चर्चासत्रात आपले मत मांडले. ते म्हणाले, सप्टेंबर महिन्यात एका मुस्लिम संघटनेने जारी केलेल्या फतव्यामुळे असहिष्णुतेच्या वातावरणाशी मला सामना करावा लागला होता. माजीद माजिदी यांच्या ‘मुहम्मद : मेसेंजर आॅफ गॉड’ या इराणी चित्रपटाला संगीत दिल्याच्या विरोधात दोन महिन्यांपूर्वी मुंबईतील रजा अकादमी संघटनेने मी आणि माजिदी हे मुस्लिमविरोधी असल्याचा आरोप ठेवत माझे कार्यक्रम उधळण्याचा इशारा दिला होता. परंतु आपला देश हा महात्मा गांधी यांच्या विचारांचा देश आहे, आपण शांततेच्या मार्गाने आपला निषेध व्यक्त करायला हवा. पुरस्कार वापसीबाबत ते म्हणाले, शांततेच्या मार्गाने निषेध नोंदविणे आपली परंपरा आहे. मुस्लिम या देशात सुरक्षित आहेत का, या प्रश्नाला त्यांनी सध्या यावर उत्तर देण्याच्या मन:स्थितीत मी नाही, असे सांगितले.
आमिरच्या मताशी मी सहमत -ए.आर.रेहमान
By admin | Published: November 26, 2015 12:10 AM