मुंबई - अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील वाद पेटला असताना या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही कंगनाने ओढले आहे. बीएमसीने कंगनाच्या अनाधिकृत कार्यालयावर हातोडा मारल्यानंतर पालिकेने २४ तासांत तत्परता दाखवत सुडबुद्धीने कारवाई केली असा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर सोशल मीडियात कंगनाला २०१८ मध्ये नोटीस बजावल्याचं एक पत्र व्हायरल झालं. हे पत्र मला मिळालेलं नसल्याचे सांगत शरद पवारांचा संबंध कंगनाने या जागा खरेदी व्यवहारात जोडला आहे.
या पत्राचं ट्विट करत कंगनानं म्हटलं होतं की, महाराष्ट्र सरकारचे पेड सोर्स चुकीची माहिती पसरवत आहेत. बीएमसीने मला कुठेही नोटीस पाठवली नव्हती. माझ्याकडे सगळी कागदपत्रे होती, जी बीएमसीकडून मला नुतनीकरणासाठी देण्यात आली होती. कमीतकमी बीएमसीनं धेर्याने उभं राहिले पाहिजे आता खोटं का बोलत आहात? असा सवाल करत तिने ते पत्र पोस्ट केले होते. वास्तव म्हणजे बीएमसीने कंगनाच्या खार येथे फ्लॅट आहे त्याठिकाणी नोटीस पाठवली होती. ज्या बंगल्यावर बीएमसीने बुधवारी कारवाई केली त्या पाली हिल येथील मालमत्तेला कोणत्याही प्रकारे बीएमसीने नोटीस दिली नव्हती. यावरही जी नोटीस बीएमसीने पाठवली ती फक्त माझ्यासाठी नव्हती तर संपूर्ण इमारतीला होती. केवळ माझ्या फ्लॅटचा इश्यू नव्हता. या नोटिशीला त्या बिल्डरने सामोरे जाण्याची गरज आहे, ही इमारत शरद पवारांशी संबंधित आहे. आम्ही हा फ्लॅट त्यांच्या पार्टनरकडून विकत घेतला आहे. त्यासाठी ते उत्तरदायी आहेत असंही कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
कंगनाने केलेल्या आरोपाबद्दल शरद पवार यांना विचारले असता, नाव न घेता पवारांनी मिश्कील टीपण्णी केली. माझी पण इच्छा आहे... माझ्या नावावर अशी कोणी बिल्डिंग करावी. अर्थात जे कोणी बोलत आहे त्या व्यक्तीकडून जबाबदारीने बोलण्याची अपेक्षा धरावी का..? हा प्रश्न आहे.', असे पवार यांनी म्हटले. तसेच, भीमा-कोरेगाव प्रश्नावरुन होत असलेल्या अटकेबद्दल पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दररोज कुणाला ना कुणाला अटक करण्यात येत आहे. मात्र, हे योग्य असल्याचे आम्हाला वाटत नाही, असेही पवार म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांनीही दिले उत्तर
शरद पवारांचे नाव घेतल्याबद्दलच्या कंगनाच्या ट्विटला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही कंगनावर नाव न घेता निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्र उभा केला, बांधला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये, पण जिला महाराष्ट्राबाबत काहीच माहिती नाही ती म्हणते त्यांनी बिल्डिंग बांधली, मानसिकरोगी अशा शब्दात आव्हाडांनी कंगना राणौतवर टीका केली आहे.
शिवसेनेसाठी कंगना विषय संपला
दरम्यान कंगना प्रकरणावर आज शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची बैठक झाली त्यानंतर राऊतांनी भूमिका जाहीर केली. सोनिया, पवार नाराज असल्याची अफवा पसरवू नका, असं काहीही नाही. कंगना हा विषय आमच्यासाठी संपला आहे, आम्ही ते विसरून गेलोय. आम्ही आमच्या नेहमीच्या सामाजिक, राजकीय कामाला लागलोय. ती काय ट्विट करतंय ते वाचले नाही, आम्ही फक्त सामना वाचतो. असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावरून पवारांनी बुधवारी दिलेला सल्ला शिवसेनेने मनावर घेतला असं बोललं जात आहे. या प्रकरणाला जास्त महत्त्व देऊ नये असं पवारांनी म्हटलं होतं.