मुंबई : कोरोना साथीच्या काळात अभिनेते सोनू सूद हे स्थलांतरित कामगारांसाठी रक्षणकर्ते म्हणून पुढे आले. त्यांनी शेकडो स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी मदत केली. अलीकडेच एका रेडिओशी बोलताना त्यांनी वस्तुस्थिती आणि विश्वसनीयता यासाठी वृत्तपत्रांचे महत्त्व अधोरेखित केले. सोनू सूद म्हणाले की, वृत्तपत्र अतिशय आवश्यक आहेत. मी माझ्या मुलांना नेहमीच पेपर वाचण्याचे सांगतो. जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा वृत्तपत्र वाचणे हा आमच्या गृहपाठाचा भाग होता. आम्हाला दररोज २० वृत्तपत्र लेख सादर करण्यास सांगितले जात. त्यानिमित्त आम्हाला वाचावे लागत होते. जगात काय सुरु आहे हे समजण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अशाप्रकारचा उपक्रम करुन घेणे अनिवार्य करावे, असे मला वाटते. त्यांना हे कळूनही येईल की, जीवनात वर्तमानपत्रांचे काय महत्त्व आहे. न्यूज पेपर जगण्यातील अविभाज्य भाग वर्तमानपत्र हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग राहिलेले आहे, हे सांगताना दबंग अभिनेते सोनू सूद म्हणाले की, जेव्हा मी पंजाबमधील माझ्या गावी होतो तेव्हा माझी एक दिनचर्या होती. सकाळी उठल्याबरोबर वर्तमानपत्र वाचण्याची सवय होती. आजकाल तर सकाळ होताच चहासोबत आपण वर्तमानपत्र वाचत नाही, तोपर्यंत मला तर वाटतच नाही की, ही सकाळ परिपूर्ण झाली आहे. वर्तमानपत्र जगण्यातील फार मोठा भाग बनलेला आहे.
मी माझ्या मुलांना नेहमीच सांगतो, वर्तमानपत्र वाचा -सोनू सूद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 5:15 AM