उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एका व्यक्तीचे चालान (पावती) फाडल्यानंतर त्याने पोलिसांसोबत हुज्जत घातली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओतील व्यक्ती मी भाजपचा नगरसेवक असल्याचे सांगत पोलिसांसोबत वादावादी करत असल्याचे दिसून येते. मी भाजपचा नगरसेवक आहे, माझी पावती फाडणार का, असा सवाल ही व्यक्ती करत आहे. तर, तुम्ही हेल्मेट घातलं नाही, तुम्हाला पावती फाडावी लागेल, असं पोलिस बोलताना व्हिडिओत स्पष्ट ऐकू येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्तीचं नाव मनोज सैनी असं आहे. या व्यक्तीची पत्नी रेनू ह्यांनी मेरठच्या खजौली वार्ड नंबर ३८ येथून भाजपच्या नगरसेविक पदासाठी निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाल्याचे सांगण्यात येते. तरीही, मनोज सैनी हे स्वत: नगरसेवक असल्याचे सांगत पोलिसांसोबत वाद घालताना दिसून येत आहेत.
मेरठमध्ये दुचाकीवरुन प्रवास करताना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे, पोलिस चेकींग अभियान सुरू असून ठिकठिकाणी पोलिसांकडून वाहनधारांना हेल्मेटबाबत विचारणा केली जात आहे. तसेच, दंडही आकारला जात आहे. दरम्यान, स्कुटीवरुन जात असलेल्या मनोज सैनी यांना पोलिसांनी अडवले. त्यावेळी, अर्धा किमी दूर नगरपालिका आहे, तिथंच माझं हेल्मेट आहे, मी नगरसेवक आहे, तुम्ही माझे चालान फाडणार का? असा प्रश्न सैनी पोलिसांना करतात. त्यांच्याकडे वाहन परवानाही नसल्याचे पोलिसांनी म्हटले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र, पोलिसांनी सैनी यांच्याकडून दंड वसुल केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.