CM Sukhvinder Singh Sukhu ( Marathi News ) : हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्यू यांनी काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र आता स्वत: सुखविंदर सुख्यू यांनी समोर येत या चर्चा फेटाळून लावल्या असून मी राजीनामा दिला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. "मी सामान्य घरातून आलेला आणि संघर्ष करणारा योद्धा आहे. विजय नेहमी संघर्षाचाच होतो. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण आपलं बहुमत सिद्ध करू," असा विश्वास मुख्यमंत्री सुख्यू यांनी व्यक्त केला आहे.
राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आमदारांनी केलेलं क्रॉस वोटिंग आणि आज सकाळी विक्रमादित्य सिंह यांनी दिलेल्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याचा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्यू यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र सुख्यू यांनी या चर्चेत तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. "भाजप घाबरला असल्याने त्यांच्याकडून माझ्या राजीनाम्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. माझ्या राजीनाम्याने काँग्रेस पक्षात खळबळ उडून आमदार फुटतील असं त्यांना वाटत आहे. मात्र काँग्रेस पक्ष एकजूट असून हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेन," असा दावाही सुख्यू यांनी केला आहे.
दरम्यान. सरकारकडून माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा अवमान होत असल्याचं सांगत त्यांचे पुत्र आणि विद्यमान मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय आज सकाळी घेतला. तसंच काँग्रेसच्या सहा आमदारांनीही मुख्यमंत्र्यांविरोधात बंड पुकारलं आहे. त्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता असताना वर्तवली जात आहे.
हिमाचल प्रदेशातील सरकार वाचवण्यासाठी जबाबदारी काँग्रेस नेतृत्वाने कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यावर सोपवली असून मुख्यमंत्र्यांना हटवावं लागलं तरी चालेल पण सरकार कोसळता कामा नये, अशा सूचना काँग्रेस नेतृत्वाकडून या दोन्ही नेत्यांना देण्यात आल्याची माहिती आहे.