मी तर लोकसेवक, माझी पात्रता काय? काँग्रेसच्या टीकेला पंतप्रधान मोदी यांचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 06:07 AM2022-11-22T06:07:26+5:302022-11-22T06:08:29+5:30
‘काँग्रेसचे लोक म्हणतात की, ते मोदींना त्यांची जागा दाखवतील. अहो, तुम्ही राजघराण्यातील आहात, मी सामान्य कुटुंबातील आहे. माझी कोणतीही पात्रता नाही. माझी पात्रता मला दाखवू नका, मी जनतेचा सेवक आहे, नोकराची कोणतीही पात्रता नसते. कृपया विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करा. गुजरात विकसित करण्यासाठी मैदानात या.’
सुरेंद्रनगर : ‘मी जनसेवक आहे, माझी पात्रता ती काय?’, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील प्रचारसभेत काँग्रेसवर टीका केली. तेलंगणात पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांच्या शिव्याशाप हेच माझे पोषण आहे, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता गुजरातमध्ये काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांच्या पात्रतेसंदर्भातील वक्तव्याचा पंतप्रधानांनी समाचार घेतला. आगामी निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असे मिस्त्री म्हणाले होते.
सुरेंद्रनगर जिल्ह्यातील ध्रांगध्रा, भरूच जिल्ह्यातील जंबूसर आणि नवसारी शहरात सोमवारी पंतप्रधान मोदी यांच्या सभा झाल्या. सुरेंद्रनगरमध्ये पंतप्रधान म्हणाले, ‘काँग्रेसचे लोक म्हणतात की, ते मोदींना त्यांची जागा दाखवतील. अहो, तुम्ही राजघराण्यातील आहात, मी सामान्य कुटुंबातील आहे. माझी कोणतीही पात्रता नाही. माझी पात्रता मला दाखवू नका, मी जनतेचा सेवक आहे, नोकराची कोणतीही पात्रता नसते. कृपया विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करा. गुजरात विकसित करण्यासाठी मैदानात या.’
गांधीनगर : प्रतिष्ठेचा लढा
गुजरात निवडणुकीत अमित शहा अधिकाधिक वेळ आपल्या गृहराज्यात व्यतित करू लागले आहेत. गांधीनगर हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. तेथून पक्षाला अधिक यश मिळवून देण्यासाठी त्यांनी जोर लावला आहे.
आदिवासींच्या अस्तित्वाकडे काँग्रेसचे दुर्लक्ष
- प्रभू राम आणि भगवान कृष्णाच्या काळापासून आदिवासी देशात राहत असतानाही काँग्रेसच्या नेत्यांचे आदिवासींच्या अस्तित्वाकडे दर्लक्ष झाले, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमधील आदिवासीबहुल भरूच जिल्ह्यातील जंबूसर शहरात केली.
- सार्वजनिक कार्यक्रमात पारंपरिक आदिवासी पोशाख परिधान केल्याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची थट्टा केली होती, असा दावाही त्यांनी केला.
- “अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होईपर्यंत आदिवासींसाठी वेगळे मंत्रालय का नव्हते? केंद्रात अटलजींच्या सरकारने वेगळे मंत्रालय बनवले व त्यांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली,” हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
‘भारत जोडो’वर टीका
सत्तेबाहेर फेकलेल्यांना यात्रेच्या माध्यमातून परतायचे आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. नर्मदा प्रकल्प रोखणाऱ्यांबरोबर काँग्रेस नेते ‘भारत जोडो यात्रा’ काढत आहेत, अशी टीका केली. नर्मदा प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांचा पराभव करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.