नवी दिल्ली :इतिहासकारांनी भारतीयसंदर्भात इतिहासाचे पुनर्लेखन करावे, सरकार त्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा देईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी येथे सांगितले. ‘मी इतिहासाचा विद्यार्थी आहे आणि मी अनेकवेळा ऐकतो की आपला इतिहास योग्यरीत्या लिहिला गेलेला नाही तसेच तो विकृत करण्यात आला आहे. कदाचित ते बरोबर असेल; परंतु आता आपण तो दुरुस्त करण्याची गरज आहे,’ असे ते म्हणाले. आसाम सरकारच्या दिल्लीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते. इतिहासकार आणि विद्यार्थ्यांना केंद्र त्यांच्या संशोधनासाठी मदत करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले. मुघलांचा विस्तार रोखण्यात लचित यांनी बजावलेल्या भूमिकेवर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, सारियाघाटच्या लढाईत त्यांची प्रकृती खराब असूनही त्यांनी मुघलांचा पराभव केला. त्यांनी लचित यांच्यावरील माहितीपटाचे उद्घाटनही केले.