कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून म्हणजेच १ मार्चपासून सुरूवात झाली. यादरम्यान, ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्ष वयापेक्षा अधिक वय असलेल्या आणि गंभीर आजार असलेल्या नागरिकांनाही लस दिली जाणार आहे. दरम्यान, राज्यसभेतील विरोधीपक्षातील नेते मल्लिकार्जुन खरगे यांना याविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी तरूणांना प्राधान्य दिलं जावं असं म्हटलं. "माझं वय हे ७० वर्षांपेक्षा अधिक आहे. तुम्ही ही लस सर्वप्रथम तरूणांना दिली पाहिजे. माझी आयुष्याची १०-१५ वर्ष शिल्लक असतील. परंतु ज्यांच्याकडे पुढची अनेक वर्ष आहेत अशा तरूणांना ही लस देण्यात यावी," अशी प्रतिक्रिया मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली.
काय म्हणाले मोदी?"एम्स रुग्णालयात कोरोनाचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीनं काम केलं, ते कौतुकास्पद आहे." तसंच, लसीकरणासाठी पात्र असलेल्यांना आवाहन करत भारत कोरोनामुक्त बनवूयात, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. कोणाला लस मिळणार, किती रुपये द्यावे लागणार?कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा राबविला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, या टप्प्यात २७ कोटी नागरिकांचं लसीकरण केलं जाईल. जवळापास १२ हजार सरकारी रुग्णालयात कोरोना लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसंच खासगी दवाखान्यात ही लस घ्यायची असेल तर, एका लसीसाठी २५० रुपये द्यावे लागतील.