नवी दिल्ली - चित्रपटात अनेकदा एखाद्या जिवंत माणसाला मृत घोषित करून अथवा त्याचा मृत्यू झाला हे दाखवून त्याची जमीन बळाकावली जाते, त्याचा पैसा लुटला जातो. तसेच काही वेळा महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून एखादी व्यक्ती अस्तित्वातअसतानाही तिला मृत दाखवलं जातं. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये घडली आहे. मुरादाबादमधील कुंदरकीमध्ये एका वृद्ध महिलेला ती जिवंत आहे हे सिद्ध करण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शरीफन असं या वृद्ध महिलेचं नाव आहे. त्या मुरादाबादमधील कुंदरकी येथील रहिवासी आहेत. काही वर्षांपूर्वी शरीफन यांच्या पतीचा मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर त्यांना विधवा महिलांना दिली जाणारी पेन्शन मिळत होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून अचानक त्यांना मिळणारी पेन्शन ही बंद झाली. पेन्शन का आणि कशी बंद झाली याबाबत आजींनी सरकारी कार्यालयात चौकशी केली. मात्र कार्यालयात कोणीचं त्याचं म्हणणं ऐकून घेत नाही.
आजींनी याबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना दोन वर्षांपूर्वी काही कागदपत्रांमध्ये मृत दाखवण्यात आल्याचं समजलं. शरीफन यांचा मृत्यू झाल्याचं कारण देण्यात आलं. त्यानंतर विधवांना मिळणारी पेन्शन मिळावी यासाठी त्या प्रयत्न करत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून आपण जिवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी आणि त्यांना महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत.
शरीफन दोन वर्षांपासून मदत मागत आहेत. तसेच पेन्शनसाठी कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. मात्र त्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही. सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारून आता थकल्याची माहिती आजींनी दिली आहे. मदत न मिळत असल्याने अखेर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली आहे. यानंतर कागदपत्राची तपासणी करण्यात येत असून अधिक चौकशी केली जात असल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.