नवी दिल्ली - केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या विधानाबाबत जनतेची माफी मागितली आहे. तसेच माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचेही आठवले यांनी म्हटले. पत्रकारांनी मला वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबाबत प्रश्न विचारला. त्यावर, मी उत्तर दिले. मी मंत्री आहे, मला सरकारी गाडी मिळते, त्यामुळे या दरवाढीचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही, असे मी म्हटल्याचे आठवलेंनी सांगितले.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीचा सर्वसामान्यांच्या जीवनमानावर परिमाण होत आहे. त्यामुळे पेट्रोल अन् डिझेलच्या किमती कमी झाल्याच पाहिजेत, असे माझे मत आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता, असेही आठवले यांनी स्पष्ट केले. आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना आठवलेंनी जनतेची माफी मागितली. तसेच मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते मंत्री असा प्रवास केला आहे. त्यामुळे मला याची जाणीव असून मी सरकारकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्याची मागणी करणार असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, शनिवारी आठवले यांना पत्रकारांनी वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबाबत प्रश्न विचारल होता. त्यावर आठवलेंनी मला फरक पडत नाही असे उत्तर दिले. ''पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काय आहेत, याने काहीही फरक पडत नाही. माझ्या वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेल सरकारकडून भरले जाते. माझं मंत्रिपद गेल्यानंतर कदाचित मला महागाईची झळ बसू शकेल'', असे वक्तव्य रामदास आठवले यांनी शनिवारी जयपूर येथे केले. ''पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे जनता होरपळतेय, ही बाबदेखील मान्य आहे. इंधनाच्या वाढणाऱ्या किमती कमी करणं, हे सरकारचं कर्तव्य आहे'', असेही यावेळेस आठवले यांनी म्हटले होते. मात्र, आज पुन्हा पत्रकारांसमोर आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत असल्याचे आठवलेनी म्हटले.