नवी दिल्ली - टोकियो ऑलिंपिकमध्ये मेडल मिळवणाऱ्या पदकविजेत्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. मात्र, विश्वचॅम्पियन स्पर्धेत सुवर्ण, आशियाई चॅम्पियन स्पर्धेत सुवर्ण, सातवेळा नॅशनल चॅम्पियन असूनही मल्लिका हंडा या खेळाडूला तिच्या नोकरीसाठी झगडावं लागत आहे. मल्लिका भारताची डेफ चेस प्लेयर असून तिला बोलता आणि ऐकताही येत नाही. नुकतेच मल्लिकाने ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर करत आपली कैफियत मांडली आहे.
मल्लिकाने नॅशनल आणि इंटरनॅशनल स्पर्धेत देशासाठी अनेक मेडल जिंकले आहेत. मात्र, सरकारकडून कधीही मल्लिकाला प्रोत्साहन मिळालं नाही. एकीकडे टोकियो ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक स्पर्धेत खेळाडूंना मिळणारं प्रोत्साहन, देण्यात येणारी बक्षीसे आणि सरकारकडून मिळणाऱ्या नोकऱ्या पाहता मल्लिकांवर हा अन्याय होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केलीय.
मल्लिका गेल्या अनेक वर्षांपासून पंजाब सरकारकडून नोकरी, कोच आणि प्रोत्साहन भत्ता मिळावा यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, सरकारने याकडे कधीही लक्ष दिले नाही. पंजाबच्या जालंधरची रहवाशी असलेल्या मल्लिकाने गेल्या काही दिवसांत सातत्याने ट्विट करुन आपली कैफियत मांडली आहे. आज पुन्हा एकदा तिने व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.