ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी वाचलेल्या महिषासूर पत्रकावरुन विरोधकांनी माफीची मागणी केली आहे. जेएनयू प्रकरणावर लोकसभेत बोलताना स्मृती इराणी यांनी महिषासूर पत्रक वाचून दाखवलं होतं, ज्यामध्ये दुर्गा देवीबद्दल काही आक्षेपार्ह मजकूर लिहिला गेला होता. स्मृती इराणी यांनी देवीचा अपमान केला असून त्यांनी माफी मागावी या मागणीसाठी विरोधकांनी राज्यसभेत गदारोळ घातला. स्मृती इराणींनी यावर स्पष्टीकरण देत, मला सत्य सांगायचं होत म्हणून मी ते पत्रक वाचलं. मीदेखील देवी दुर्गाची भक्त आहे आणि ते वाचताना मलादेखील खुप यातना झाल्या. विद्यापीठातील अधिकृत कागदपत्रांपैकीच ते एक होतं' असं सांगितल. मात्र विरोधकांनी गदारोळ सुरुच ठेवला. स्मृती इराणी यांचं वक्तव्य तपासलं जाईल आणि जर त्यात काही आक्षेपार्ह असेल तर काढून टाकण्यात येणार आहे.
आम्ही स्मृती इराणींना भाषण थांबवण्याची विनंती करत होतो, पण त्यांनी भाषण चालूच ठेवले, आम्ही ईश्वरनिंदात्मक काहीही सहन करणार नाही - आनंद शर्मा, काँग्रेस नेते.
देवी दुर्गेबद्दल स्मृती इराणी यांनी जे विधान केले त्याबद्दल त्यांनी सभागृहाची माफी मागावी, इराणी यांनी ईश्वरनिंदात्मक विधान केले - आनंद शर्मा, काँग्रेस नेते.