नवी दिल्ली : मीच काँग्रेसची पूर्णवेळ व सक्रिय अध्यक्ष आहे. पक्षाचे नेते मला थेट भेटू शकतात, आपले म्हणणे मांडू शकतात. त्यांनी प्रसारमाध्यमांमार्फत माझ्याशी बोलू नये, मला स्पष्टवक्तेपणा आवडतो, अशा शब्दांत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी आपल्याच पक्षांच्या नेत्यांना कार्यकारिणीच्या बैठकीत सुनावले. भाजप व मोदी सरकारवरही त्यांनी सडकून टीका केली.काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल आवश्यक आहेत, अशी मागणी २३ नाराज नेत्यांनी केली होती. पूर्णवेळ अध्यक्ष नसताना निर्णय कोण घेतो हेच कळत नाही. पक्षाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी कार्यकारिणीची तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी कपिल सिब्बल यांनीही केली होती. त्याबाबत सोनिया म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाने तयारी सुरू केली आहे; पण पक्षात ऐक्य व शिस्त आवश्यक आहे. पक्षहितावर लक्ष ठेवल्यास निवडणुकांत आपली कामगिरी चांगली असेल. पक्ष पूर्वीसारखा सक्रिय व आक्रमक व्हावा, असे सर्वांना वाटत आहे. पण त्यासाठी पक्षाला सर्वोच्च महत्त्व द्यायला हवे.राहुल गांधी यांना साकडेराहुल गांधी यांनीच पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी, असे मत अशोक गेहलोत, अंबिका सोनी तसेच अन्य अनेक नेत्यांनी व्यक्त केली. राहुल गांधी यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, वेळ आल्यावर मी प्रस्तावाचा विचार करेन.नवा अध्यक्ष पुढील वर्षीनवा पक्षाध्यक्ष ३० जूनपर्यंत निवडण्याचे ठरले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही प्रक्रिया पुढे ढकलली. मात्र आजच्या बैठकीत निवडणूक कार्यक्रम निश्चित करण्यात आला. पक्षाध्यक्षपदाची निवडणूक पुढील सप्टेंबरमध्ये होणार असून, त्याआधी सर्व पातळ्यांवरील संघटनात्मक निवडणुका होतील.केंद्र सरकार शेतकरीविरोधी; महागाईमुळे सामान्यांचे हालभाजपवर टीका करताना सोनिया गांधी म्हणाल्या की, लखीमपूरमधील हिंसाचारातून भाजप शेतकरीविरोधी असल्याचे सिद्ध झाले आहे. देशाची आर्थिक स्थितीही चांगली नाही. सरकारी उपक्रम विकणे हेच मोदी सरकारचे धोरण आहे. अन्नधान्य, इंधन महागले असून, त्यामुळे सामान्यांचे हाल होत आहेत.मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण अयशस्वी ठरले आहे. भारत-चीन सीमावाद अधिक वाढला आहे. बिगरभाजप सरकारे असलेल्या राज्यांना मोदी सरकार सातत्याने अडचणीत आणत आहे, असा आरोप करून त्या म्हणाल्या की, काश्मीरमध्ये निरपराध लोकांच्या गेल्या काही दिवसांत हत्या झाल्या. तिथे जातीय सलोखा राखण्यातही मोदी सरकार अपयशी ठरले आहे.काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला प्रियांका गांधी यांच्यासह राजस्थान, पंजाब व छत्तीसगडचे मुख्यमंत्री अनुक्रमे अशोक गेहलोत, चरणजितसिंग चन्नी व भूपेश बघेल तसेच वेणुगोपाल, आनंद शर्मा आदी ५२ नेते उपस्थित होते.
मीच काँग्रेसची पूर्णवेळ अध्यक्ष! सोनिया गांधींनी असंतुष्टांना सुनावले, थेट संपर्क साधण्याची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 6:31 AM