"मला आनंद आहे की अमित शाहांनी..."; गृहमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर प्रियांका गांधींचं खास ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 01:14 IST2024-12-31T01:12:34+5:302024-12-31T01:14:19+5:30

काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. 

"I am happy that Amit Shah..."; Priyanka Gandhi's special tweet after the Home Minister's decision | "मला आनंद आहे की अमित शाहांनी..."; गृहमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर प्रियांका गांधींचं खास ट्विट

"मला आनंद आहे की अमित शाहांनी..."; गृहमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर प्रियांका गांधींचं खास ट्विट

केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियांका गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलेल्या एका निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. केंद्रीय गृह मंत्रालयाने वायनाडसंदर्भात एक निर्णय घेतला. वायनाडमध्ये भूस्खलन होऊन प्रचंड नुकसान झालं. जीवित हानीबरोबर मोठे आर्थिक नुकसान झाले. ही घटना नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आली. याबद्दलच प्रियांका गांधींनी पोस्ट केली. एक मागणीही त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. 

काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्णयाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावर प्रियांका गांधी यांनी एक पोस्ट केली. 

"मला आनंद होतोय की, गृहमंत्री अमित शाह यांनी वायनाडमधील दुर्घटनेला गंभीर नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुनर्वसनाची गरज असलेल्या लोकांना बरीच मदत मिळेल आणि निश्चितपणे हे एक योग्य दिशेने उचलण्यात आलेले पाऊल आहे", असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. 

याचबरोबर प्रियांका गांधी यांनी एक मागणीही केली आहे. "यासाठी जर पुरेसा निधीही लवकरात लवकर उपलब्ध करून दिला, तर आम्ही सगळे आभारी असू", असेही त्यांनी म्हटले आहे. 

डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच खासदार प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली केरळमधील खासदारांच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. भूस्खलनाचा फटका बसलेल्या लोकांना केंद्र सरकारने मदत करण्याची मागणी केली होती. राजकारण बाजूला ठेवून मदत करण्यात यावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली होती. 

२९ जुलै २०२४ रोजी निसर्गाचा प्रकोप वायनाडमध्ये बघायला मिळाला होता. वायनाडमध्ये भूस्खलन होऊन प्रचंड नुकसान झाले होते. मुंडक्कई, चूरलमाला, अट्टामाला आणि नूलपुजा ही चार गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. 

Web Title: "I am happy that Amit Shah..."; Priyanka Gandhi's special tweet after the Home Minister's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.