लखनऊ - उत्तर प्रदेश विधानसभेत मंगळवारी अभिभाषणावर चर्चा करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. त्यांनी म्हटलं की, 'मी तेव्हाही बोललो होतो आणि आजही गर्वाने म्हणतो की मी हिंदू आहे. मी ईद साजरी करत नाही, पण जर कोणी आपला सण साजरा करत असेल तर सरकार त्यांना पूर्ण सहकार्य करेल आणि सुरक्षाही पुरवेल'.
यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना टोला मारत म्हटलं की, 'आम्हाला हिंदू असल्याचा गर्व आहे, पण आम्ही तसले हिंदू नाही आहोत जे घरात जानवं घालतात आणि बाहेर आल्यावर टोपी'. पुढे ते बोलले की, 'असं तेच लोक करतात ज्यांच्या मनात पाप असतं'.
तुम्ही 'ग' वरुन गाढव शिकवलंत, आम्ही 'गणेश' शिकवूमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंगळवारी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत उत्तर देत होते. 'विरोधक महापुरुषांच्या जयंती/पुण्यतिथीच्या सुट्ट्या रद्द करण्यावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे, पण जनतेने यांचीच सुट्टी केली आहे. तुमची मानसिकताच खराब आहे. तुम्ही 'ग' वरुन गाढव शिकवलंत, आम्ही 'गणेश' शिकवू', असं योगी आदित्यनाथ बोलले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी आम्ही नवीन अभ्यासक्रम आणणार असून त्यात महापुरुषांबद्दल मुलांना सांगितलं जाईल असं म्हटलं आहे.