नवी दिल्लीः कानपूरमधील एका वसतिगृहातील ५७ मुलींना कोरोनाची लागण झाल्याचा आणि त्यापैकी पाच मुली गरोदर असल्याचा खळबळजनक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. त्यावरून आता उत्तर प्रदेशात राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय.
उत्तर प्रदेशच्या बाल संरक्षण आयोगानं पाठवलेल्या नोटिशीला काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांनी सडेतोड उत्तर दिलंय. ''माझ्यावर जी कारवाई करायची ती बिनधास्त करा, मी इंदिरा गांधींची नात आहे, विरोधी पक्षातील काही नेत्यांप्रमाणे भाजपाची अघोषित प्रवक्ता नाही. मी नेहमी सत्य मांडत असते आणि ते माझं कर्तव्य आहे'', असा आक्रमक पवित्रा प्रियंका यांनी घेतला आहे.
कानपूर वसतिगृहात अल्पवयीन मुली गरोदर राहिल्याप्रकरणी आणि त्यातही एचआयव्ही आणि हेपेटायटीसच्या संसर्गाच्या मुद्द्यावरून प्रियंका गांधींनी काही दिवसांपूर्वी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. तसंच, उत्तर प्रदेश सरकारच्या कारभारावरही त्या सातत्याने टीका-टिप्पणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर, बाल संरक्षण आयोगाने प्रियंका यांना नोटीस बजावली होती. त्यावरून, त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारला एकप्रकारे आव्हानच दिलंय.
जनतेची एक सेविका या नात्याने सत्य समोर आणणं आणि उत्तर प्रदेशच्या जनतेच्या हितांचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. सरकारी कामांचा प्रचार करणं हे नाही. उत्तर प्रदेश सरकार काही विभागांच्या माध्यमातून मला अकारण धमक्या देऊन स्वतःचा वेळ वाया घालवत आहे, अशी चपराक प्रियंका गाधींनी लगावली आहे.
मोदींकडून योगींना शाबासकी!
दरम्यान, कोरोना संकटकाळात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने उत्तम प्रकारे काम केल्याची शाबासकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. संकटाचं संधीत रूपांतर करण्याचं काम उत्तर प्रदेशने योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली केलंय. ते सर्व राज्यांसाठी आदर्श असंच आहे. आधीची सरकारं असती तर रुग्णालयांची संख्या, खाटांची संख्या अशी कारणं देत त्यांनी हे आव्हान स्वीकारलंच नसतं. मात्र, उत्तर प्रदेशातील कोविडयोद्ध्यांना सोबत घेऊन या सरकारनं-प्रशासनानं ८५ हजार जणांचा जीव वाचवलाय, अशी कौतुकाची थाप मोदींनी दिलीय.
आणखी वाचाः
कोरोनाला हरवण्यासाठी एकच औषध मला माहीत आहे, ते म्हणजे...; पंतप्रधान मोदींचा 'डोस'
तुम्हाला घर मिळाले, मला काय देणार? मोदींच्या प्रश्नावर शेतकऱ्याने दिले असे उत्तर...
पाच मुली झाल्या, पण 'विकास' जन्मलाच नाही; काँग्रेस नेत्याच्या ट्विटनं वाद