मुस्लीम - दलितांचा मोदींना कळवळा
गजानन जानभोर, वाराणशी
‘मी जाती-धर्माचे नाही तर विकासाचे राजकारण करतो,’ असे प्रत्येक प्रचारसभेत सांगणार्या नरेंद्र मोदी यांनी आता मुस्लीम-दलितांबद्दलच्या कळवळ्याची भाषा सुरू केली आहे. आपण ‘खालच्या जाती’चे आहोत, हा साक्षात्कारही त्यांना पहिल्यांदाच झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात फैजाबादच्या सभेत रामनामाचा जप करणार्या मोदींनी त्यानंतर २४ तासांच्या आत मुस्लीमांप्रति असलेली ‘कडवट’ भूमिका सौम्य करीत जातीचेही कार्ड खेळले आहे. मंगळवारी उत्तर प्रदेशातील डुमरियागंज येथील प्रचारसभेत मोदी यांना अचानक दलित-मुस्लिमांची आठवण झाली. गरिबांना जात-धर्म नसतो. त्यामुळे आता हिंदू व मुसलमानांनी आपापसात लढण्यापेक्षा गरिबीच्या विरोधात एकत्र येऊन लढावे, असा उपदेश मोदी यांनी दिला. ‘मी खालच्या जातीचा असल्यामुळेच माझा अपमान होत आहे़ खालच्या जातीत जन्मास येणे गुन्हा आहे का?’ असा भावनिक सवाल करणार्या मोदींच्या या नव्या भूमिकेने अनेकांना बुचकळ्यात टाकले आहे. त्यास प्रियंका गांधी-वड्रा यांच्या ‘मोदी नीचले स्तर की राजनीति कर रहें है’, या टीकेचा संदर्भ असला तरी मोदींचा एकूण आविर्भाव ते जणू या संधीची वाटच पाहात असल्याजोगा होता. गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलींसाठी प्रायश्चित्त घेण्यास तयार नसलेले, त्यासाठी मुस्लीम समुदायाची माफी मागायला नकार देणारे मोदी मंगळवारी अचानक इतके ‘मवाळ’ झाले कसे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. उत्तर प्रदेशातील १५ जागांवर बुधवारी आणि १८ जागांवर १२ मे रोजी मतदान होत आहे. या सर्व मतदारसंघांत जातीचे समीकरण फार प्रभावी आहे. दलित-मुस्लिमांशिवाय इतर मागासवर्गीयांचीही मते या मतदारसंघांतील गणिते बिघडवू शकतात. मोदींना अचानक आलेल्या जातीच्या कळवळ्यामागे ते एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. फैजाबाद येथे सोमवारी रामनामाचा जप करीत ‘प्राण जाय पर वचन न जाए’या अयोध्येच्या संस्कृतीचा गजर केला होता. त्यामुळे आधीच भयग्रस्त असलेल्या मुस्लीम समाजात अस्वस्थता वाढू शकते, हे नंतर लक्षात आल्यामुळे मोदींनी ही सौम्य भूमिका घेतल्याचेही बोलले जात आहे. गरिबांना जात-धर्म नसतो. त्यामुळे आता हिंदू व मुसलमानांनी आपापसात लढण्यापेक्षा गरिबीच्या विरोधात एकत्र येऊन लढावे, असेही मोदी म्हणाले.