चंदीगढ : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेकांनी केंद्र सरकारने दिलेले पुरस्कार परत दिले आहेत. मात्र, ''मी माझ्या शेतकरी बांधवांसोबत'' म्हणत पंजाबच्या डीआयजींनी थेट नोकरीवरच लाथ मारली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी (Farmers Protest) डीआयजी (जेल) लखविंदरसिंग जाखड (Lakhwinder Singh Jakhar) यांनी राजीनामा दिला आहे.
जाखड यांनी राज्याच्या मुख्य गृह सचिवांकडे राजीनामा सोपविला आहे. जाखड यांनी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात मुदतपूर्व रिटायरमेंट घेत असल्याचे म्हटले आहे. ''मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी कृषी कायद्यांविरोधात शांततेत आंदोलन करणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांसोबत आहे. यामुळे मी राजीनामा देत आहे.'', असे त्यांनी म्हटले आहे.
पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधून शेतकरी आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन फोडण्यास केंद्र सरकारला यश आले आहे. क्रीडा जगतापासून ते साहित्य जगतापर्यंत अनेकांनी आपले पुरस्कार मागे देण्याचे जाहीर केले आहे.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेले देशव्यापी आंदोलन आजही सुरुच आहे. आज ट्रॅक्टरने रस्ते जाम करण्यात येणार असून उत्तर प्रदेशमध्ये आंदोलनाला मोठा झटका लागला आहे. उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनी आंदोलन संपविण्याचा निर्णय घेतला आहे. तेथील शेतकरी चिल्ला बॉर्डरवरून बाजुला झाले असून नोएडा-दिल्ली वाहतूक सुरु झाली आहे. शेतकरी आणि राज्य सरकार यांच्यामध्ये कृषी आयोग बनविण्यावरून सहमती बनल्याने हा निर्णय घेतला आहे.
शेतकरी आंदोलन फुटले; राजनाथ सिंहांना भेटून उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनी रस्ते मोकळे केलेरविवारी सकाळी १२ वाजता संघटनांचे पदाधिकारी बैठक घेणार होते. सेक्टर-१४ मध्ये भारतीय किसान युनियन (भानू गट) चे वरिष्ठ पदाधिकारी याबाबतचा निर्णय घेणार आहेत. महत्वाचे म्हणजे दिल्ली-नोएडाच्या चिल्ला सीमेवरील आरएएफ, आरपीएफ देखील हटविण्यात आली आहे. दिल्लीच्या बाजुनेही पोलिसांच्या तुकड्या हटविण्यात आल्या आहेत. ही सीमा १२ दिवसांनी पुन्हा वाहतुकीसाठी खुली झाली आहे. चिल्ला सीमेवरील शेतकरी रात्री उशिरा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना जाऊ भेटले होते. यावेळी कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमरदेखील होते. दोन्ही पक्षांदरम्यान झालेल्या चर्चेत चिल्ला सीमा खुली करण्यात आली. या बैठकीत १८ मागण्या ठेवण्यात आल्या. या मागण्यांमध्ये एमएसपीचा उल्लेख नाहीय. मात्र, ही शेतकरी संघटना अन्य मागण्यावरून अडून बसली आहे.