नवी दिल्ली: संसदेत झालेल्या घुसखोरीवरून आक्रमक भूमिका मांडणाऱ्या विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनाचा सपाटा सुरू आहे. लोकसभेत आणि राज्यसभेत मागील काही दिवसांत तब्बल १४१ खासदारांना निलंबित करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर संसद परिसरात काल विरोधी पक्षांच्या खासदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले. मात्र या आंदोलनादरम्यान टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी थेट उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री करत खिल्ली उडवली.
कल्याण बॅनर्जींच्या या मिमिक्रीवरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपतींना फोन करुन भावना व्यक्त केल्या. परिसरात खासदारांनी केलेली घृणास्पद कृती वेदनादायी असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मी मागील २० वर्षांपासून सातत्याने असा अपमान सहन करत आहे. मात्र भारताच्या उपराष्ट्रपतीपदासारख्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीबाबत संसद परिसरात अशी कृती होणं दुर्दैवी असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले.
कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतींची मिमिक्री केली, त्यावेळी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी देखील उपस्थित होते. राहुल गांधी या मिमिक्रीचा व्हिडिओ काढताना दिसले. आज संसद परिसरात राहुल गांधी दाखल झाल्यानंतर पत्रकारांनी सदर प्रकरणावर प्रश्न विचारला. यावर मी यावर भाष्य करणार नाही, असं उत्तर राहुल गांधींनी दिलं.
विरोधी खासदारांची आजही निदर्शने-
खासदारांच्या निलंबनाबाबत विरोधकांनी केंद्राच्या विरोधात मोर्चेबांधणी केली आहे. संसदेच्या परिसरात उपस्थित असलेल्या गांधी पुतळ्यासमोर विरोधी पक्षाच्या खासदारांनी निदर्शने केली. या धरणे आंदोलनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी खासदार उपस्थित आहेत. यावेळी मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, खासदारांचे निलंबन योग्य नाही. सरकारची वृत्ती पूर्णपणे हुकूमशाही आहे. केंद्र सरकारच्या विरोधात हे निदर्शन सुरूच राहणार, आम्ही थांबणार नाही, असं खर्गे यांनी सांगितले.