नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या अध्यक्षाची निवड अद्याप न झाल्याने पक्षात निर्नायकी अवस्था निर्माण झाली आहे. पक्षात नेतृत्वावरून सुरू असलेल्या अनिश्चिततेदरम्यान मी आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी नाही, मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नव्या अध्यक्षाची निवड काँग्रेसची कार्यकारी समिती करेल, असेही त्यांनी सांगितले. बुधवारी प्रसारमाध्यमांनी संवाद साधताना राहुल गांधी यांनी आपल्या राजीनाम्याविषयी भूमिका स्पष्ट केली. मी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षपदावर आता मी नाही. आता काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण असेल याचा निर्णय पक्षाची कार्यकारी समिती घेईल. तसेच पक्षाने अध्यक्षपदासाठी विनाविलंब निवडणूक घेऊन नव्या अध्यक्षाची निवड केली पाहिजे. आधीच राजीनामा दिलेला असल्याने मी या प्रकियेमध्ये सहभागी नसेन.''असे राहुल गांधी यांनी सांगितले.
दरम्यान, राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक पत्र प्रसिद्ध केले आहे. काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी मी स्वीकारली आहे. पक्षाच्या वाढीच्या दृष्टीने या पराभवाचे उत्तरदायित्व स्वीकारून मी राजीनामा देत आहे,'''असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.