आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत विरोधक आता सक्रिय झाले आहेत. भाजप एकीकडे गमावलेल्या जागा पुन्हा मिळवण्याची रणनीती तयार करत आहे, तर विरोधकही एकत्रित येण्याच्या प्रयत्नांत आहेत. यामधील सर्वात मोठं नाव म्हणजे नितीश कुमार. गेल्याच महिन्यात त्यांनी बिहारमध्ये अशी राजकीय खेळी खेळली की भाजपला सत्तेपासून दूर केलं. आता नितीशकुमार दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. दिल्लीत त्यांनी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांचीही भेट घेतली.
महाराष्ट्रानंतर बिहारच्या राजकारणातही मोठी घडामोड पाहायला मिळाली होती. नितीश कुमार यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसंच त्यांनी तेजस्वी यादव यांच्यासोबत हातमिळवणी केली. त्यानंतर त्यांनी महाआघाडीसोबत जाण्याची घोषणा करत आठव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
दरम्यान, नितीश कुमार यांनी माध्यमांशीही संवाद साधला. बिहारमध्ये आघाडी आहे, त्यामुळे इथे पक्षांच्या नेत्यांची भेट होत आहे. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांचीही भेट होईल. अनेक दिवस दिल्लीत आलो नाही, परंतु आता येणं ही काही विशेष बाब नाही. अधिकाधिक विरोधक एकत्र आले तर चांगलं असेल, असं नितीश कुमार म्हणाले. याशिवाय आपली पंतप्रधान बनण्याची कोणतीही इच्छा नाही. अधिकाधिक विरोधकांनी एकत्र यावं यासाठी आम्ही सहकार्य करून. पंतप्रधान पदावर माझा कोणताही दावा नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.