नवी दिल्ली - भाजपाचे आमदार अशोक लाहिरी (Ashok Lahiri) हे तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी जोरदार चर्चा पश्चिम बंगालमध्ये सुरू होती. पण आता लाहिरी यांनीच यावर स्पष्टीकरण दिलं आहे. पक्षांतराबद्दलच्या चर्चा या फक्त अफवा असल्याचं म्हटलं आहे. तसेच मी काही मुकूल (आंब्याचा गळणारा मोहोर) नाही, जो पक्ष सोडेल, असं म्हणत त्यांनी भाजपा सोडून तृणमूलमध्ये सामील झालेल्या मुकूल रॉय यांच्यावर जोरदार निशाणा साधला. लाहिरी हे बालुरघाट विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे आमदार आहेत. त्यांनी भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून काम केलं होतं.
एएनआयशी संवाद साधताना अशोक लाहिरी यांनी "मी टीएमसीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या अफवांमुळे मलाही मोठा धक्का बसला आहे. मी मुकूल (आंब्याचा गळणारा मोहोर) नाही, जो पक्ष सोडेल. लोकांनी मला भाजपाच्या तिकिटावर निवडून दिले आहे. आम्ही विरोधी पक्षात आहोत आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे विरोधी पक्ष म्हणून काम करेन. मी बंगालच्या कल्याणासाठी काम करण्यासाठी राजकारणात आलो आहे. मी नेहमीच राज्य सरकारवर टीका करेन असे नाही. जर त्यांनी काही चांगले केले तर मी नक्कीच त्यांचे कौतुक करेन. त्यांना गरज असेल तिथं मी त्यांना सूचनावजा सल्ला देईन" असं म्हटलं आहे.
"तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणताही अर्ज पाठवलेला नाही"
अशोक लाहिरी यांनी "तृणमूल काँग्रेसचे प्रमुख किंवा पक्षाच्या इतर प्रमुख नेत्यांसोबत कोणताही संवाद झाला नाही. किंवा मी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणताही अर्ज पाठवलेला नाही. मी "आयाराम-गयाराम" नाही. मी पक्ष बदलत आहे का, असं जर कोणी मला विचारलं, तर ते मला खूप अपमानास्पद वाटतं" असं देखील म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये अनेक भाजपा नेत्यांनी आता तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो टीएमसीमध्ये सामील झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.