पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार इशारे देऊनही भाजपाचे वाचाळवीर काही शांत बसायला तयार नाहीत. केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यावरून याचा प्रत्यय आला. त्या मंगळवारी छतरपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी म्हटले की, मी कधीच दलितांच्या घरी जेवायला जात नाही. परंतु, यासाठी माझ्याकडे ठोस असे कारण आहे. त्यामुळेच मी वेगळ्या ठिकाणी जेवते किंवा दलित समाजातील लोकांना भोजनासाठी घरी बोलावते. त्यांच्या घरी जाऊन जेवायला मी काही प्रभू रामचंद्र नव्हे. मी घरी जेवायला गेल्याने ते पवित्र होणार नाहीत. किंबहुना दलित लोक जेव्हा आपल्या घरात येऊन जेवतील तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने पवित्र होऊ. त्यामुळेच मी सामाजिक समरसता वाढवण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या भोजन समारंभांमध्ये सहभागी होत नाही, असे उमा भारती यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपाला पुन्हा विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. काही वेळाने आपण काय बोलून बसलो याची उपरती उमा भारती यांना झाली. या गावात समरसता भोजन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, हे मला माहिती नव्हते. दलित समाजाच्या लोकांच्या घरी जाऊन त्यांना भेटणे, त्यांची विचारपूस करणे त्यांच्या घरी जेवण करणे या सगळ्या गोष्टी आता मागे पडल्या आहेत, असेही मत उमा भारती यांनी नोंदवले. राजकारणातही दलितांसोबत भेदभाव केला जातो तो दूर झाला पाहिजे, दलितांच्या आर्थिक समृद्धीसाठी आणि त्यांना समाजात एक चांगले स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, अशी सारवासारव उमा भारती यांनी करावी लागली.गेल्या काही दिवसांतील घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलित समाजातील पक्षाविषयीची नाराजी दूर करण्याचे आदेश नेत्यांना दिले आहेत. त्यासाठी दलितबहुल गावांमध्ये एका रात्रीसाठी वास्तव्य करा, असे मोदींनी भाजपाच्या नेत्यांना सांगितले आहे.
दलितांच्या घरी जेवायला मी काही श्रीराम नाही- उमा भारती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2018 10:41 AM