नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज ईडीसमोर हजर रहायचे आहे. राहुल गांधी हे गेल्या काही दिवसांपासून परदेशात होते. यामुळे त्यांनी ईडीकडे चौकशीची वेळ पुढे ढकलावी अशी मागणी केली होती. यामुळे आज राहुल हे ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
काँग्रेसने राहुल गांधी यांना अडकविण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. २०१५ साली हे प्रकरण बंद करण्यात आले होते, ते पुन्हा उकरून काढण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. तसेच ईडीच्या या कारवाईविरोधात काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली आहे.
यामुळे दिल्ली पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावले आहेत. राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. काँग्रेस मुख्यालयासमोर घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्यावरील ईडीच्या कारवाईचा निषेध म्हणून काँग्रेसने राहुल यांच्या निवासस्थानापासून पोस्टरबाजी सुरु केली आहे. यामध्ये ''मी सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे'', ''मोदी, शाह हा राहुल गांधी आहे, झुकणार नाही'', अशा प्रकारची पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
काँग्रेसचे म्हणणे काय...भाजपच्या दडपशाहीविरोधात काँग्रेस सोमवारी मुंबई आणि नागपूर येथील ईडी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे. लोंढे म्हणाले की, १९३७ साली पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, पुरुषोत्तम टंडन, आचार्य नरेंद्र देव, रफी अहमद किडवई या महान नेत्यांनी या वृत्तपत्राची स्थापना केली. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत नॅशनल हेराल्डने मोलाची भूमिका बजावली. स्वातंत्र्यानंतरही लोकशाही, संविधान व काँग्रेसचा विचार पुढे चालू ठेवण्यासाठी हे वर्तमानपत्र तोट्यात असतानाही चालूच ठेवले होते. या वर्तमानपत्रातील पत्रकार, कर्मचारी यांचा पगार देता यावा यासाठी काँग्रेसने नॅशनल हेराॅल्डला २००२ ते २०११ दरम्यान ९० कोटी रुपये १०० हप्त्यात कर्जाने दिले. अशा प्रकारे कर्ज देणे कोणत्याही कायद्याखाली बेकायदेशीर नाही. ९० कोटींचे हे कर्ज नॅशनल हेराॅल्डला परत करणे शक्य नसल्याने असोसिएटेड जनरल लिमिटेडने ते इक्विटी शेअरमध्ये परावर्तित केले आणि हे शेअर ‘यंग इंडिया’ या ’नॉट फॉर प्रॉफिट’ कंपनीला कलम २५ अंतर्गत हस्तांतरित करण्यात आले. त्यावेळी सोनिया गांधी, राहुल गांधी, दिवंगत ऑस्कर फर्नांडिस, दिवंगत मोतीलाल व्होरा, सुमन दुबे हे या कंपनीचे व्यवस्थापकीय सदस्य होते. यांना कोणत्याही प्रकारचा लाभांश मिळालेला नाही. हे सर्व सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ असताना केवळ राजकीय द्वेषातून ही कारवाई केली जात असल्याचा आरोप लोंढे यांनी केला.