ऑनलाइन लोकमत -
उत्तर प्रदेश, दि. 19 - 'मी पृथ्वीराज चव्हाण आहे' म्हणत लग्नमंडपात घुसून नववधूच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याची घटना बरेलीत घडली आहे. स्वताला राजपूत लढवय्या समजणा-या या तरुणाला उपस्थितांनी मात्र चांगलाच चोप दिला.
बरेलीतील गावात हा विवाह सोहळा सुरु असताना ही घटना घडली. वैवाहिक विधी सुरु असताना महादेव नावाचा हा तरुण अचानक आपल्या मित्रांसोबत तिेथे आला आणि 'मी पृथ्वीराज चव्हाण आहे' म्हणत तलवार आणि बंदुकीचा धाक दाखवत नववधूच्या अपहरणाचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित नातेवाईकांनी त्याला चांगलाच चोप दिला आणि नववधूची सुटका करुन घेतली.
तरुणाला पोलिसांच्या हवाली केले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. मात्र या तरुणाची मानसिक स्थिती नीट नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.