नवी दिल्ली- काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या तासाभराच्या बैठकीनंतर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. तसेच ज्योतिरादित्य शिंदे समर्थक आमदारांनीही राजीनामे दिले आहेत. या घटनेनं देशाच्या राजकारणात भुकंप झाला आहे. काँग्रेसमधील अनेक नेते शिंदेना दोष देत आहेत, तर काहीजण शिंदेच्या समर्थनार्थ बोलत आहेत. याच पार्श्वभूमीवर ज्योतिरादित्य यांच्या मुलाने ट्विटरवरुन कमेंट केली आहे.
मुलगा महाआर्यमान यांनी मला माझ्या वडिलांचा अभिमान असल्याचं म्हटलंय. महाआर्यमान यांनी वडिलांच्या निर्णयावर ट्विट करुन आपलं मत व्यक्त केलंय. मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे, संपूर्ण कुटुंब तुमच्या पाठिशी आहे. एक वारसा सोडायला हिंमत लागते. माझं कुटुंब कधीही सत्तेसाठी भुकेलं नव्हतं. आम्ही वचन दिल्याप्रमाणे भविष्यात देशात आणि मध्य प्रदेशात प्रभावी बदल घडवू, असे महाआर्यमान याने ट्विट करुन म्हटलंय.
दरम्यान, या राजीनाम्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी तातडीनं बैठक बोलावली आहे. त्यातच सकाळी मोदी आणि शहांच्या घेतलेल्या भेटीनंतर ज्योतिरादित्य शिंदे भाजपा प्रवेश करणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. 18 वर्षांचा प्रवास मागे सोडून पुढे जाण्याची वेळ आली आहे. आता एक नवीन सुरुवात करायची आहे, असंही ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपला राजीनामा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींकडे सोपवला आहे. ज्योतिरादित्य यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर भाजपानं संध्याकाळी सीईसीची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत ज्योतिरादित्य शिंदेसुद्धा सहभागी होण्याची शक्यता आहे.