नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री आणि माजी ऑलिम्पिकपटू असलम शेर खान यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल यांच्या जागेवर आपली दावेदारी दाखल केली आहे. काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी आपण तयार असल्याचे पत्र शेर खान यांनी राहुल गांधी यांना पाठवले आहे. असलम शेर खान यांनी १९७५ मध्ये हॉकीचे मैदान गाजवले होते.
लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाकडे सोपविला. पक्षाने तो फेटाळला असला तरी अध्यक्षपदासाठी दावा करणारे असलम शेर खान एकमेव काँग्रेस नेते आहेत. राहुल यांच्या राजीनाम्यावर सर्वांनी एकमताने राहुल यांना पदावर कायम राहण्याची विनंती केली होती. तरी देखील राहुल राजीनाम्यावर ठाम असल्याचे सुत्रांनी सांगितले.
असलम शेर खान यांनी पत्रात म्हटले की, मी पक्षाची सेवा करू इच्छित असून दोन वर्षांसाठी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर विराजमान होऊ इच्छितो. याआधी मी हॉकी खेळाडू म्हणून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत माझ्यातील क्षमता सिद्ध केल्याचे असलम यांनी पत्रात म्हटले. १९७५ मधील विश्वचषक स्पर्धेतील उपान्त्य फेरीत भारत २-१ ने पिछाडीवर होता. त्याचवेळी अखेरच्या क्षणात मला पर्यायी खेळाडू म्हणून मैदानात पाठविण्यात आले. त्यावेळी मी भारतीय संघाकडून शानदार कामगिरी करत इतिहास घडविला होता, असंही असलम शेर खान यांनी पत्रात नमूद केले.
या व्यतिरिक्त १९९६ मधील निवडणुकीत काँग्रेसला १४० जागांवर विजय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केले होते. तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवल्यास मी तुम्हाला निराश करणार नाही, असंही असलम शेर खान यांनी सांगितले. तसेच तुम्हीच सर्वोत्तम अध्यक्ष असल्याचं त्यांनी राहुल गांधी यांनी म्हटले.