नवी दिल्ली : मी रांगेमध्ये शेवटी उभ्या माणसाबरोबर उभा आहे. मी शोषीत-पीडित, त्रस्त लोकांच्या सोबत आहे. त्यांचा धर्म, जात, आस्था या बाबी मला महत्त्वाच्या वाटत नाहीत, मला देशातील सर्वजण प्रिय आहे... मी काँग्रेस आहे.. अशा आशयाचे ट्विट करून, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी भाजपाच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले.काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष आहे, असे राहुल गांधी म्हणाल्याचे वृत्त एका उर्दू वृत्तपत्रात प्रकाशित झाल्यानंतर, ते तसे म्हणालेच नव्हते, असे काँग्रेसने स्पष्ट केले होते. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाने यानिमित्ताने काँग्रेस व राहुल यांच्यावर हल्ला चढवला होता. पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस केवळ मुस्लीम पुरूषांबरोबर आहे की मुस्लीम महिलांबरोबरही आहे, हे स्पष्ट करावे असे म्हटले होते. तलाकपीडित महिलांबाबत काँग्रेसची काय भूमिका आहे, असा सवाल मोदी यांनी केला होता. काँग्रेस जातीय राजकारण करीत असल्याचा आरोप संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला होता.
मी शोषितांबरोबर उभा आहे- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 5:23 AM