ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल सौम्य भूमिका घेतल्याचा आरोप गुरुवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी फेटाळून लावला. आरएसएसचा फूट पाडण्याचा जो अजेंडा आहे त्याविरोधात लढणे मी थांबवणार नाही. मी जे बोललो त्या प्रत्येक शब्दावर मी ठाम आहे असे राहुल यांनी सांगितले.
आरएसएस सत्ताधारी भाजपाची वैचारीक मार्गदर्शक आहे असे राहुल यांनी सांगितले. बुधवारी राहुल यांनी सर्वोच्च न्यायालयात आरएसएस संघटना म्हणून गांधी हत्येला दोषी नाही असे सांगितले होते. आरएसएसशी संबंधित लोक गांधी हत्येला जबाबदार असल्याचे आपण म्हटले होते असे त्यांनी सांगितले.
२०१४ लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी बोलताना राहुल यांनी हे विधान केले होते. त्यांच्या या विधानाविरोधात आरएसएस स्वयंसेवकाने राहुल यांच्यावर अब्रु नुकसानीचा खटला दाखल केला. राहुल गांधींनी जे स्पष्टीकरण दिलेय त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आरएसएसच्या याचिकाकर्त्याला आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.