नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आता दुसऱ्या टप्प्यासाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील कैसरगंजचेभाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी निवडणूक लढवण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. आपण प्रबळ दावेदार असून कैसरगंजमधून निवडणूक लढवणार, हे ९९.९ टक्के निश्चित असल्याचे ब्रिजभूषण शरण सिंह यांनी सांगितले आहे.
महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी ब्रिजभूषण शरण सिंह आरोपी आहेत. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटलाही सुरू आहे. अशा स्थितीत ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभा जागेबाबत सट्टेबाजीचा फेरा सुरू आहे. ब्रिजभूषण शरण सिंह हे भाजपाचे विद्यमान खासदार आहेत. विशेष म्हणजे भाजपाने उत्तर प्रदेशातील बहुतांश जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत, मात्र कैसरगंज मतदारसंघातील उमेदवार अद्याप जाहीर केला नाही. अशा स्थितीत ब्रिजभूषण सिंह यांनी स्वत: निवडणूक लढवण्याबाबत विधान केले आहे.
ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले, "मी सध्या उमेदवार नाही, पण कैसरगंज जागेवर भाजपासमोर कोणतेही आव्हान नाही. गेल्या निवडणुकीत विजयाचे अंतर २ लाखांपेक्षा जास्त होते. यावेळी कार्यकर्त्यांनी ५ लाखांहून अधिक मतांचा नारा दिला आहे. देवाने असे ठरवले असेल तर मी काय करू शकतो? मी एक मजबूत उमेदवार आहे, त्यामुळे मी निवडणूक लढवण्याची ९९.९ टक्के शक्यता आहे. ०.१ टक्क्यांबाबत काहीही सांगता येणार नाही. पक्षाने एक तास अगोदर उमेदवार जाहीर केल्यास जनता मलाच विजयी करेल."
ब्रिजभूषण शरण सिंह हे मोठ्या संपत्तीचे मालक आहेत. ते ५४ हून अधिक महाविद्यालये आणि शाळा, नर्सिंग महाविद्यालये चालवतात. यापैकी बहुतेक संस्थांमध्ये, व्यवस्थापक आणि संचालक एकतर स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या मूळ गावी गोंडा व्यतिरिक्त लखनऊमध्ये अनेक चल आणि जंगम मालमत्ता आहेत. ते एकापेक्षा जास्त खासगी जेट आणि हेलिकॉप्टरचा मालक असल्याचेही सांगितले जाते. त्यांना महागड्या गाड्यांचा शौक आहे. त्यांच्या ताफ्यात अनेक आलिशान वाहने आहेत, ज्यातील अनेकांची किंमत करोडोंची आहे.
दरम्यान, महिला कुस्तीपटूंनी भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यांच्याविरोधात दिल्लीत कुस्तीपटूंनी दीर्घ आंदोलन देखील केले होते. यामुळे भाजपावर सर्वच स्तरातून टीका झाली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ब्रिजभूषण शरण सिंह यांना भाजपा तिकीट देणार की नाही, हे अद्याप जाहीर झाले आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.