सध्या मी आठ लाखांहून अधिक मुलांचा पिता आहे. मात्र जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत वडील बनण्याचा हा क्रम असाच सुरू राहील. माझ्या मुलांची काळजी चांगल्या प्रकारे घेता यावी यासाठी मी विवाह न करता जीवनभर ब्रह्मचारी राहण्याचा निर्णय घेतला होता, हे उद्गार आहेत बिहारमधील ४० वर्षीय ब्रह्मचारी गजेंद्र यादव यांचे. त्यांना बिहारमधील लोक पर्यावरण पुरुष म्हणून ओळखतात. त्यांच्या कामाचं कौतुक करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह इतर अनेक नेत्यांनीही त्यांना पुरस्कृत केलं आहे.
वासुदेव यादव यांचे पुत्र गजेंद्र यादव हे पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बगहा-२ अंतर्गत येणाऱ्या पिपरा गावातील रहिवासी आहेत. ते सांगतात की, लहानपणापासून त्यांच्यामध्ये काही वेगळं करण्याची इच्छा होती. मात्र लक्ष्य स्पष्ट नव्हते. दरम्यान, २० वर्षांपूर्वी जेव्हा त्यांनी रेडिओवर ग्लोबल वॉर्मिगबाबत ऐकलं तेव्हा त्यांचं लक्ष्य अगदी स्पष्ट झालं.
त्यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एक अशी प्रतिज्ञा केली की, त्यामुळे विवाह न करताच ते लाखो मुलांचे वडील बनले. गजेंद्र यांनी लग्न न करता आपलं संपूर्ण जीवन हे पर्यावरण संरक्षणामध्ये गुंतवण्याचा निर्णय घेतला. २००३ पासून त्यांनी जागोजागी वृक्षरोपन करण्यास सुरुवात केली. गेल्या २० वर्षांमध्ये त्यांनी त्यांनी बिहार तसेच उत्तर प्रदेशातील अनेक भागामध्ये आठ लाखांहून अधिक झाडांची लागवड केली.
गजेंद्र सांगतात की, त्यांनी पर्यावरणासोबतच लग्न केलं आहे. लांबलांबचे लोक त्यांना केवळ वृक्षारोपनासाठी बोलवतात. गजेंद्र यांनी लावलेली झाडं कधी वाळत नाहीत, अशी लोकांची समजूत आहे. त्यांनी झाडांनाच आपली लेकरं मानली आहेत. त्यामुळे ते त्यांची गणना करणं विसरत नाही. गजेंद्र यांनी लावलेल्या बांबूच्या झाडांमुळे वाल्मिकीनगर क्षेत्रामध्ये मातीची धूप बऱ्यापैकी थांबवली आहे.