‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 17:07 IST2024-05-16T17:06:43+5:302024-05-16T17:07:57+5:30
Priyanka Gandhi News: आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालिवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचया निवासस्थानी झालेल्या कथित मारहाणीचं प्रकरण सध्या चर्चेत आहे. तसेच या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाची कोंडी झाली आहे.

‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान
आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालिवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचया निवासस्थानी झालेल्या कथित मारहाणीचं प्रकरण सध्या चर्चेत आहे. तसेच या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाची कोंडी झाली आहे. या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय असलेल्या विभव कुमार यांच्यावर आरोप झाले असून, राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणी समन्स पाठवले आहे. दरम्यान, अनेक महिला नेत्या स्वाती मालिवाल यांना पाठिंबा देत आहेत. आता काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनीही या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
या प्रकरणी प्रियंका गांधी यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता त्यांनी सांगितलं की, सध्या मी उत्तर प्रदेशमध्ये असल्याने याबाबत मी अधिक काही पाहिलेलं नाही. मात्र कुठल्याही महिलेसोबत काही अत्याचार झाला असेल, तर मी त्या महिलेच्या बाजूने बोलेन. मी त्या महिलेच्या बाजूने उभी राहीन. मात्र भाजपा नेते याबाबत काय बोलू शकतात? भाजपाने हाथरस प्रकरणी काहीही केलेलं नाही. उन्नाव प्रकरणी काहीही केलेलं नाही. भाजपाने महिला कुस्तीपटूंबाबतही काहीही केलेलं नाही.
जर खरोखरच काही चुकीचं घडललं असेल, तर मी त्या महिलेसोबत उभी राहीन. जर स्वाती मालिवाल यांना माझ्याशी बोलायचं असेल, तर मी त्यांच्यासोबत बोलेन. जर अरविंद केजरीवाल यांना या बाबत काही माहिती असेल तर ते योग्य कारवाई करतील, अशी मला अपेक्षा आहे. यातून अरविंद केजरीवाल स्वाती मालिवाल यांना मान्य होईल, असा काही तोडगा काढतील, अशी मला आपेक्षा आहे. मी नेहमी कुठल्याही प्रकारच्या अत्याचाराविरोधात बोलत आले आहे. आता या प्रकरणामध्येही जी कारवाई करण्याची आवश्यकता असेल ती केली गेली पाहिजे, असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.