नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या मातोश्रींचे निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या ह्रदयरोगाशी संबंधित उपचार सुरू होत. हर्ष वर्धन यांनीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे.
डॉ. हर्षवर्धन यांनी मातोश्रींच्या निधनाने अतिशय दु:ख झाल्याचे सांगत, मी पृथ्वीतलावावरील सर्वात प्रिय व्यक्तीला गमावल्याचे त्यांनी म्हटलंय. आज सकाळी ह्रदयरोगाचा झटका आल्याने ती स्वर्गवासी झाली आहे. माझ्यासाठी विशाल व्यक्तीमत्व, मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान असलेली आई गेल्याने मी पोरका झाला आहे, तिची उणीव कुणीही भरून काढू शकत नाही, असे म्हणत हर्ष वर्धन यांनी अतिशय भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही हर्ष वर्धन यांच्या मातोश्रींना श्रद्धाजली वाहिली असून आम्ही आपल्या दु:खात सहभागी असल्याचे म्हटले आहे.