नवी दिल्ली : हिंसाचार होत असेल तर तो कोणासाठीही योग्य नाही. हिंसाचार झाला तर त्याची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. गेल्या 20-25 वर्षांच्या चौकशी आयोगाचा अहवाल सांगतो की, राज्य सरकारांची इच्छा नसेल तर हिंसाचार पसरत नाही, असे भाष्य गुजरातमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत झालेल्या हिंसाचारावर असदुद्दीन ओवेसी यांनी केले.
हिंसाचार ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, असे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. आरोपींना अटक करून योग्य तपास करून कारवाई व्हावी, अशी आमची इच्छा आहे. तुमच्याकडे आयबी रिपोर्ट होता तर तुम्ही का झोपले होते? तुम्ही त्याचा पर्दाफाश करायला हवा होता, तिथे पोलिस बंदोबस्त तैनात करून हिंसाचार थांबवायला हवा होता. तुमची गुंतागुंतीची वागणूक लपविण्यासाठी तुम्ही संध्याकाळी कथा आणता. अशा कथा आता जुन्या झाल्या आहेत, असेही म्हणत असदुद्दीन ओवेसी यांनी गुजरात राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
याचबरोबर, किती दिवस तुम्ही जुन्या गोष्टी समोर आणत राहणार? आपले अपयश स्वीकारा. तुम्ही स्वतः सहभागी आहात. भजने वाजवली पाहिजेत, पण कसल्या घोषणा दिल्या? 50-100 तलवारी फिरवण्यात आल्या. पोलिसांच्या उपस्थितीत हे करण्यात आले. सरकारला हिंसाचार हवा होता आणि त्यात मिलीभगत आहे, असा आरोपही असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.
हिंसाचारात 11 जणांचा सहभाग रविवारी रामनवमीच्या दिवशी उसळलेल्या हिंसाचार आणि जाळपोळीबाबत गुजरात पोलिसांनी बुधवारी मोठा खुलासा केला आहे. हा हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. खंभातमध्ये झालेल्या हिंसाचारात स्लीपर मॉड्यूलखाली कट रचण्यात आला होता. दरम्यान, या हिंसाचारात 11 जणांचा सहभाग आहे. आरोपी परदेशात बसलेल्या लोकांच्या संपर्कात होते. आरोपींनी 3 दिवस बैठक घेऊन कट रचला होता. रझाक नावाच्या मौलवीने या हिंसाचाराची योजना आखली होती. 11 गुन्हेगारांची चौकशी सुरू आहे, असे एसपी अजित राजियन यांनी सांगितले.