PM on Gaza Attack: इस्रायल- पॅलेस्टाईनमधील युद्धाला सात महिने उलटले तरी दोघांमधील वाद थांबवण्याचे नाव घेत नाही. या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा बळी गेला. जगभरातील देशांनी हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला असला तरी यात यश आलेलं नाही. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात हिंदू मुस्लिम असा मुद्दा पेटलेला असताना या युद्धातील एक किस्सा सांगितला आहे. गाझामध्ये बॉम्बस्फोट थांबवण्यासाठी मी प्रयत्न केल्याचे नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. याआधी देखील मोदींनी रशिया युक्रेन युद्ध काही वेळासाठी थांबवल्याचा दावा भाजपकडून केला जात होता.
बेंजामिन नेतन्याहू यांच्या सरकारला रमजानच्या पवित्र महिन्यात गाझामध्ये बॉम्बफेक थांबवण्याचे आवाहन करण्यासाठी आपण इस्रायलमध्ये दूत पाठवला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. याशिवाय इस्रायल-पॅलेस्टाईन आणि रशिया-युक्रेनसह सध्या सुरू असलेल्या युद्धाबाबतही मोदींनी भारत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. रमजानच्या काळात इस्रायलने गाझावर बॉम्बफेक करु नये यासाठी आपण कसा प्रयत्न केला हे मोदींनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले.
"तो रमजानचा महिना होता. मी माझा विशेष दूत इस्रायलला पाठवला आणि पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना किमान रमजानच्या काळात गाझावर बॉम्बस्फोट करू नयेत, असे सांगण्यास आणि पटवून देण्यास सांगितले. इस्त्रायलने त्याचे पालन व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण शेवटी दोन-तीन दिवस भांडण झाले," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.
माझे पॅलेस्टाईनशी जेवढे जवळचे नाते आहे तेवढेच माझे इस्रायलशी आहे. मी इस्रायलला गेलो होतो. पूर्वी एक फॅशन होती की इस्रायलला जायचे असेल तर पॅलेस्टाईनला जावे लागते. धर्मनिरपेक्षता करा आणि परत या. पण मी तसे करण्यास नकार दिला, असं ही पंतप्रधान मोदी म्हणाले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी जॉर्डनमार्गे पॅलेस्टाईनला जाताना घडलेल्या एका घटनेबद्दलही सांगितले. “जेव्हा पैगंबर मुहम्मद यांचे थेट वंशज असलेल्या जॉर्डनच्या राष्ट्राध्यक्षांना जेव्हा कळले की मी जॉर्डनच्या हवाई मार्गे पॅलेस्टाईनला जात आहे, तेव्हा त्यांनी मला सांगितले की मोदीजी तुम्ही असे जाऊ शकत नाही. तुम्ही माझे पाहुणे आहात आणि माझे हेलिकॉप्टर वापरा. मी त्याच्या घरी जेवायला गेलो, पण हेलिकॉप्टर जॉर्डनचं होतं आणि डेस्टिनेशन पॅलेस्टाईन होतं. माझ्यासोबत इस्रायली फ्लाइट अटेंडंट होते. तिघेही वेगळे पण मोदींसाठी आकाशात सगळे एकत्र आले. तुमचा हेतू चांगला असेल तेव्हा हे असे घडते असा माझा विश्वास आहे,” असे मोदींनी म्हटलं.