नवी दिल्ली - देशातील न्यायव्यवस्थेच्या इतिहासात प्रथमच 12 जानेवारी 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर, न्यायव्यवस्थेवर प्रश्न विचारले जाऊ लागले. या चार न्यायाधीशांमध्ये एक होते, न्यायमूर्ती जस्टी चेमलेश्वर. आता, चेमलेश्वर सेवानिवृत्त झाले असून ते आपल्या गावी शेती करत आहेत. तर, भारत सरकार कसं काम करतेय किंवा न्यायव्यवस्था कशी चालतेय? याचा मला काहीही फरक पडत नसल्याचं चेमलेश्वर यांनी म्हटलंय.
जस्टी चेमलेश्वर सध्या आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील आपल्या मूळगावी सुख-समाधानाने जगत आहेत. येथे ना कोर्टाची कटकट आहे, ना संसदेतला गोंधळ, अस त्यांचं म्हणणं आहे. गेल्यावर्षी 12 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायमूर्तींनी एकत्र येत मुख्य न्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यानंतर, न्यायमूर्ती चेमलेश्वर देशभरात चर्चेत आले होते. आता, पुन्हा एकदा चेमलेश्वर चर्चेत आले आहेत. कारण, निवृत्त झाल्यानंतर कुठल्याही सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला हजर न राहता, चेमलेश्वर यांनी थेट आपले गाव गाठले. आता, आपण वडिलोपार्जित शेती करणार आहे. विशेष म्हणजे आता त्यांनी माझी पेन्शन जरी थांबवली तरी मी शेती करून माझं पोट भरू शकतो, असेही चेमलेश्वर म्हणाले. मात्र, मी ज्या न्यायव्यवस्थेतील कामकामजाविरुद्ध आवाज उठवला, तेथे अद्यापही परिस्थिती जैसे थेच, असल्याचं दु:खही चेमलेश्वर यांनी व्यक्त केल.