नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच सुरु केलेल्या 'मै भी चौकीदार' मोहिमेमुळे सोशल मिडियावर भाजपा नेत्यांपासून समर्थकांनी आपल्या नावासमोर चौकीदार लिहिण्यास सुरुवात केली. मात्र, भाजपाचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आपण ब्राम्हण असल्याने नावापुढे चौकीदार केले नसल्याचे वक्तव्य केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 मार्चला मै भी चौकीदार हे घोषवाक्य घेऊन मोहिम सुरु केली होती. केवळ मी एकटाच चौकीदार नाही, भ्रष्टाचाराची लढाई लढणारा, सामाजिक गुन्हेगारीशी लढणारा आणि वाईट प्रवृत्तींवर नजर ठेवणार प्रत्येक भारतीय चौकीदार असल्याचं मोदींनी म्हटले होते. यानंतर देशपातळीवरीलच नव्हे तर राज्य पातळीवरील नेत्यांसह मोदी समर्थकांनी ट्विटर, फेसबुकवर नावापुढे चौकीदार असे नमूद केले आहे. तसेच अनेकांनी आपल्या फोटोवरही 'मै भी चौकीदार' असे लिहीत पोस्ट केले आहेत.
यावर तामिळणाडूतील एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना नावापुढे चौकीदार का लावले नाही असे विचारण्यात आले. यावर स्वामींनी मी ब्राम्हण आहे. यामुळे मी चौकीदार होऊ शकत नाही. यामुळे नावापुढे चौकीदार लावले नाही. माझ्या सूचनांवर चौकीदारांना काम करावे लागते. असेच चौकीदार ठेवणाऱ्यांना अपेक्षित असते. त्यामुळे मी त्यांच्यातला नाही, असे उत्तर दिले.
मै भी चौकीदार हूँ, या कॅम्पेनसह भाजपाने 2019 च्या लोकसभा निवडणूक अभियानाला सुरुवात केली आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून नरेंद्र मोदी 31 मार्च रोजी देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. दरम्यान, 11 एप्रिल रोजी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होणार आहे.