मी काही नामधारी प्रमुख असू शकत नाही; सिद्धू पुन्हा आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 06:18 AM2021-08-28T06:18:09+5:302021-08-28T06:19:03+5:30
पंजाब काँग्रेसमधील मतभेद पुन्हा समोर . निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मला दिले गेले नाही तर मी कोणालाही सोडणार नाही, असेही सिद्धू यांनी जाहीर केले. गेल्या तीन दिवसांत हरीश रावत यांनी तीन भाष्ये केली.
- व्यंकटेश केसरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अखिल भारतीय काँग्रेस समिती (एआयसीसी) आणि पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. “पक्षाची भूमिका आणि घटनेच्या चौकटीत कृती करून निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार राज्यांच्या प्रमुखांना आहेत,” असे पक्षाचे पंजाब प्रभारी हरीश रावत यांनी शुक्रवारी सिद्धू यांना सांगितल्यावर सिद्धू यांनी “निर्णय घेण्याची मुभा नसलेला मी काही नामधारी प्रमुख असू शकत नाही,” असे उत्तर दिले आहे.
सिद्धू यांचे सल्लागार मलविंदर सिंग माली यांना हरीश रावत यांनी अंतिम इशारा दिल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर वरील परिस्थिती निर्माण झाली आहे. अमृतसरमध्ये आपल्या समर्थकांना मार्गदर्शन करताना सिद्धू यांनी पक्षश्रेष्ठींना बजावले की, ‘आशा आणि विश्वास’ या माझ्या स्वत:च्या धोरणानुसार काम करण्याची मुभा दिली गेली तर राज्यात पुढील २० वर्षे काँग्रेसची सत्ता राहील, अशी माझी खात्री आहे. परंतु, तुम्ही जर ‘‘मला निर्णय घेऊ देणार नसाल तर मी काहीही मदत करू शकत
नाही.”
निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मला दिले गेले नाही तर मी कोणालाही सोडणार नाही, असेही सिद्धू यांनी जाहीर केले. गेल्या तीन दिवसांत हरीश रावत यांनी तीन भाष्ये केली. १) मुख्यमंत्री अमरिंदरसिंग हे पंजाब विधानसभा निवडणुकीत नेतृत्व करतील २) सिद्धू यांच्या दोन सल्लागारांनी राजीनामा द्यावा व तो न दिल्यास त्यांना काढून टाकले जाईल आणि ३) प्रदेश काँग्रेस अध्यक्षांनी पक्षाची भूमिका आणि घटनेच्या चौकटीत वागावे आणि निर्णय घ्यावा. रावत यांच्या या वक्तव्यांनी सिद्धू अस्वस्थ झाले. पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी व नेते राहुल गांधी यांच्या पाठिंब्यावर सिद्धू यांनी स्वत:ला राज्याचे आगामी मुख्यमंत्री म्हणून जनतेसमोर आणायला सुरूवात केली होती.
दरम्यान, रावत यांचे राज्य उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्याचे कारण सांगून ते पंजाब प्रभारीच्या जबाबदारीतून मुक्त होऊ इच्छितात. ही इच्छा त्यांनी सोनिया गांधी यांना कळवली आहे. रावत हे त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री असून, आताही ते त्या पदासाठी इच्छूक आहेत.
कोण निर्णय घेऊ शकते?
सिद्धू यांनी जे शब्द वापरले, त्याबद्दल विचारले असता रावत म्हणाले, “प्रसारमाध्यमांतील चर्चांच्या आधारावर मी त्यांना प्रश्न विचारू शकत नाही. त्यांच्या विधानाचा संदर्भ मी पाहीन. ते पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशिवाय कोण निर्णय घेऊ शकते?”