कोच्ची - अभिनेता ते नेता बनलेल्या केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांचं विधान पु्न्हा एकदा चर्चेत आले आहे. केरळमधून भाजपाचे एकमेव खासदार निवडून गेलेले सुरेश गोपी यांना मोदींच्या कॅबिनेटमध्ये राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र मला मंत्रिपदातून मुक्त केल्यास आनंदच होईल. सिनेमा ही माझी आवड आहे. मी अभिनयाशिवाय राहू शकत नाही असं मंत्री सुरेश गोपी यांनी म्हटलं आहे. गोपी यांचं हे विधान पहिल्यांदाच नाही तर ज्यादिवशी त्यांना केंद्रात मंत्री बनवण्यात आले त्याच्या काही तासानंतरही गोपी यांनी मंत्रिपदावरून दूर करावं अशी इच्छा व्यक्त केली होती.
गोपी बुधवारी एका फिल्म सोहळ्यात बोलत होते. सुरेश गोपी म्हणाले की, अभिनय हा माझा छंद आहे. सिनेमाशिवाय मी राहू शकत नाही. जर मला मंत्रिपदावरून हटवले तर मी खूप खुश होईन. मंत्री बनण्यापूर्वी मी आमच्या नेत्यांना हेच सांगितले होते. मी अमित शाहांना भेटलो, त्यांनी मला तुमच्याकडे किती सिनेमे आहेत असं विचारले. त्यावर माझ्याकडे जवळपास २५ स्क्रिप्ट आणि २२ सिनेमा असल्याचे सांगितले होते असं गोपी यांनी म्हटलं.
तसेच मला अभिनय पुन्हा सुरु करण्याची परवानगी मिळण्याची अपेक्षा आहे. तरीही मी सर्वांना सांगू इच्छितो, मी ६ सप्टेंबरला ओट्टाकोम्बन या सिनेमातून अभिनयात पुन्हा पर्दापण करत आहे. एक मंत्री म्हणून जबाबदारीसोबत त्रिशूरमध्ये माझ्या मतदारांना वेळ देता येत नाही. जर मला मंत्रिपदावरून हटवले तर मी अभिनयही करू शकतो आणि माझ्या मतदारसंघातील मतदारांसोबतही संपर्कात राहू शकतो असं केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी सांगितले.
दरम्यान, सुरेश गोपी यांनी त्यांच्या करिअरमध्ये २५० हून अधिक सिनेमे केलेत. ८० च्या दशकात गोपी यांनी सिनेमाला सुरुवात केली. त्यांना मलयालमचा अँग्री यंग मॅन म्हणून ओळखलं जाते. गोपी यांचा राजकीय प्रवास ४ वेळा मुख्यमंत्री राहिलेले काँग्रेसचे के.के करुणाकरण यांच्यासोबत वाढलेल्या जवळकीमुळे सुरू झाला. कालांतराने त्यांनी काँग्रेसला रामराम केला.
...म्हणून मंत्रिपदाचा दिला होकार
मला कधीही मंत्री बनायचं नव्हते, आजही बनायचे नाही. मोदी यांनी मला मंत्री बनवण्याचा निर्णय घेतला त्यांचा आदर करतो. त्यांनी म्हटलं होते, त्रिशूरच्या लोकांसाठी हे पद तुम्हाला देतोय ज्या लोकांनी मला सत्तेत येण्यासाठी मतदान केले. मी त्यांच्या या निर्णयाचा स्वीकार केला. मी आजही माझ्या नेत्यांचे ऐकतो परंतु अभिनयाशिवाय मी जगू शकत नाही असं सुरेश गोपी यांनी सांगितले.