नवी दिल्ली/चेन्नई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे दोन प्रस्ताव ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊ न केंद्रात सरकार स्थापन करावे आणि त्यास काँग्रेसने पाठिंबा द्यावा, असा एक प्रस्ताव आहे. काँग्रेसला अधिक जागा मिळाल्यास प्रादेशिक पक्षांच्या आघाडीने त्यास पाठिंबा द्यावा आणि त्यात आपणास उपपंतप्रधानपद देण्यात यावे, असा दुसरा प्रस्ताव आहे.
स्टॅलिन यांनी पहिला प्रस्ताव अमान्य केला असून, राहुल गांधी यांना पंतप्रधानपदासाठी आपला पाठिंबा राहील, असे त्यांनी केसीआर यांना सांगितले आहे. त्यानंतर काँग्रेसला पाठिंबा देण्यास केसीआर तयार झाले असून, त्यांचा स्वत:साठी उपपंतप्रधानपदासाठीचा आग्रह मात्र कायम आहे. मात्र या बैठकीतून केसीआर बिगरकाँग्रेस व बिगरभाजप पक्षांच्या आघाडीची कल्पना सोडण्यास तयार असल्याचे दिसत आहे. अर्थात त्यांच्या उपपंतप्रधानपदासाठी अन्य पक्ष तयार होतील का, हा प्रश्न आहे.
तेलंगणात लोकसभेच्या अवघ्या १७ जागा आहेत. त्या सर्व जागा केसीआर यांच्या टीआरएसने जिंकल्या तरी तृणमूल, समाजवादी पक्ष, बहुजन समाज बक्ष हे तुलनेने मोठे पक्ष केसीआर यांना ते पद देण्यास तयार होतील का, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केसीआर विरोधकांच्या महाआघाडीत आल्यास आपली हरकत नाही, असे म्हटले आहे. पण तेही केसीआर यांच्या उपपंतप्रधानपदाच्या प्रस्तावाला तयार होणार नाहीत, असे समजते. द्रमुकचे नेतेही केसीआर यांच्यामागे उभे राहण्याची शक्यता कमी आहे.
मतदानाचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर आणि मतमोजणीच्या आधी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होईल का आणि त्यास सारे पक्षनेते उपस्थित राहतील का, हे सांगणे तूर्त अवघड आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव व बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी निकालांतून चित्र स्पष्ट झाल्यानंतरच अशा बैठकीस अर्थ आहे, असे मत व्यक्त केले आहे. तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचाही निकालांआधी बैठक घेण्यास आक्षेप आहे. अशी बैठक काँग्रेसने बोलवावी, असा चंद्राबाबूंचा आग्रह होता. पण राहुल गांधी हेही बैठकीची घाई न करता निकालांची वाट पाहावी, अशा मताचे असल्याचे समजते.वायएसआरचा पेच चंद्राबाबू नायडू यांचा पक्षविरोधकांच्या महाआघाडीत असल्याने त्यात वायएसआर काँग्रेस सहभागी होईल, याची खात्री नाही. वायएसआर काँग्रेस व तेलगू देशम यांचे आंध्र प्रदेशात अजिबात सख्य नाही. दोघे प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे वायएसआरचा पेच कसा सोडवायचा हा काँग्रेसपुढील पेच आहे. शिवाय तेलंगणातील टीआरएसचा मित्र पक्ष असलेल्या अससोद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमचा काँग्रेसला कडाडून विरोध आहे. केसीआर यांनी काँग्रेसप्रणीत महाआघाडीत जाऊ नये, असे एमआयएमचे म्हणणे आहे.