Mani Shankar Aiyar : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी एक पुस्तक लिहिले आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यातील विविध घटनांचा तपशीलवार उल्लेख केला आहे. 'अ मॅव्हरिक इन पॉलिटिक्स' असे या पुस्तकाचे नाव असून, याबद्दल अय्यर म्हणतात की, "माझी राजकीय कारकीर्द गांधी कुटुंबापासून सुरू झाली आणि त्यांनीच संपवली." विशेष म्हणजे, गेल्या 10 वर्षांपासून सोनिया गांधी आणि राहुल गांधींना भेटण्याची संधी मिळाली नसल्याचा खुलासाही त्यांनी केला.
मणिशंकर अय्यर यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस आणि गांधी कुटुंबाबाबतचे त्यांचे वैयक्तिक आणि राजकीय अनुभव शेअर केले. 'अ मॅव्हरिक इन पॉलिटिक्स' पुस्तकातून अय्यर यांनी आपल्या राजकीय आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. गांधी कुटुंबाबात बोलताना ते म्हणतात, "मला दहा वर्षांत एकदाही सोनिया गांधींना भेटण्याची संधी मिळाली नाही. राहुल गांधी एकदाच भेटले." त्यांच्या या दाव्यांमुळे काँग्रेस नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.
पुस्तकात कोणत्या गोष्टींचा उल्लेख ?आपल्या पुस्तकात अय्यर यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे सुरुवातीचे दिवस, नरसिंह राव यांचा काळ, UPA I मध्ये मंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ, त्यांचे राजकीय पतन आणि UPA II सरकारचा मागोवा घेतला आहे. अय्यर यांनी 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या खराब कामगिरीचाही उल्लेख केला. 1984 मधील 404 जागांवरून 2014 मध्ये 44 जागांवर घसरल्याने काँग्रेसची कामगिरी निराशाजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रणव मुखर्जी पंतप्रधान झाले असते वृत्तसंस्थेशी बोलताना अय्यर यांनी हेही मान्य केले की, प्रणव मुखर्जी 2012 मध्ये पंतप्रधान झाले असते, तर 2014 चा पराभव कदाचित इतका लज्जास्पद नसता. मनमोहन सिंग यांच्या जागी प्रणव मुखर्जी यांची ऊर्जा आणि करिष्माई नेतृत्व काँग्रेससाठी सकारात्मक ठरू शकले असते. 2013 मध्ये काँग्रेस नेत्यांवर अनेक आरोप करण्यात आले होते, जे कायदेशीररित्या सिद्ध होऊ शकले नाहीत. सरकार आणि पक्ष माध्यमांच्या प्रश्नांना नीट उत्तरे देऊ शकले नाहीत, त्यामुळे विरोधकांच्या आरोपांमुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला.
कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा आणि अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' आंदोलनामुळे सरकारला मोठा तोटा झाला. अण्णा हजारे यांना सुरुवातीला रामलीला मैदानावर उपोषण करू न देणे आणि नंतर परवानगी देणे, ही घटना चुकीची असल्याचेही त्यांनी म्हटले. शेवटी आपल्या भविष्यातील राजकीय कारकिर्दीबाबत बोलताना अय्यर म्हणतात, मला पक्षाबाहेर राहण्याची सवय झाली आहे. मी अजूनही पक्षाचा सदस्य आहे. मी कधीही भाजपमध्ये जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले.