BJP vs Congress: काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार रणदीप सुरजेवाला यांच्या एका वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. सुरजेवाला हरियाणातील कैथल येथे जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी, 'भाजपला मत देणारे आणि त्यांचे समर्थक राक्षसी स्वभावाचे आहेत. मी त्यांना महाभारताच्या भूमीवरुन शाप देतो,' असे वक्तव्य केले आहे. सुरजेवाला यांच्या या वक्तव्यावर भाजपने पलटवार केला.
रणदीप सुरजेवाला यांच्या विधानाचा संदर्भ देत भाजप नेते अमित मालवीय म्हणाले की, या मानसिक स्थितीमुळेच त्यांचा पक्ष आणि नेत्यांनी जनआधार गमावला आहे. आता जनतेच्या दरबारात त्यांना आणखी अपमानित व्हावे लागणार आहे. सुरजेवाला यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, राक्षस कुटुंबात जन्माला आलेला माणूसच अशी असंसदीय भाषा बोलू शकतो. आम्ही या वक्तव्याची नक्कीच दखल घेऊ.
मध्य प्रदेशातील शिवराज सरकारमधील मंत्री विश्वास सारंग म्हणाले की, लोकशाहीत मतदार देव आहेत, पण काँग्रेसचे लोक त्यांना राक्षस म्हणत आहेत. यावरुन 10 जनपथच्या दारात नाक घासणाऱ्या लोकांची मानसिकता दिसून येते. रणदीप सुरजेवालांचा निवडणूक दारुन पराभव झाला. आता पुढील निवडणुकीत जनता तुमचा न्याय करेल.