दिब्रूगढ: आसाममध्ये आज ७ हायटेक कॅन्सर सेंटर्सचं उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. टाटा ट्रस्टच्या मॉडेलच्या अंतर्गत या रुग्णालयांची उभारणी करण्यात आली आहे. मोदींच्या हस्ते रुग्णालयांचं उद्घाटन होण्याआधी उद्योगपती रतन टाटांनी उपस्थितांना संबोधित केलं. त्यावेळी टाटा भावुक झाले होते.
हिंदीत बोलू न शकल्याबद्दल रतन टाटांनी सुरुवातीलाच सगळ्यांची माफी मागितली. 'आयुष्याची शेवटची वर्षे आरोग्याला समर्पित करतो. आसामला असं राज्य बनवा जे सगळ्यांना ओळखेल आणि सगळे आसामला ओळखतील,' अशी इच्छा टाटांनी व्यक्त केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा, माजी खासदार सर्वानंद सोनोवाल मंचावर उपस्थित होते.
आजपासून नवी रुग्णालयं तुमच्या सेवेत आहेत. पण आसाममधील लोकांना कधीही रुग्णालयात जावं लागू नये, अशी मी प्रार्थना करतो, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 'तुमच्या कुटुंबातील कोणालाही रुग्णालयात जाण्याची गरज भासू नये आणि आपण तयार केलेली सगळी रुग्णालयं रिकामीच राहावी,' असं मोदी म्हणाले. त्यांनी सर्बानंद सोनोवाल, हेमंता बिस्व सरमा आणि टाटा ट्रस्टचे आभार मानले.