भोपाळ : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या भाजपाच्या उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करत थेट नोटीस पाठविली आहे.
साध्वी प्रज्ञासिंह यांनी दोन दिवसांपूर्वीच 26/11च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे यांना शाप दिल्याने 21 दिवसांत सुतक संपल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर त्यांच्यासह भाजपाच्या नेत्यांवर टीकेची झोड उठली होती. यावर साध्वीने अटी-शर्तींवर वक्तव्य मागे घेतल्याचे जाहीर केले होते. तसेच तिच्यावर तुरुंगात अत्याचार झाल्याचा आरोप केला होता. यावर मानवाधिकार आयोगाने हा आरोप खोडून काढला होता.तरीही साध्वी प्रज्ञा सिंहच्या उमेदवारीचे समर्थन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेने केले होते. आता पुन्हा साध्वीने बाबरी मशीदीवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
बाबरी मशीद पाडण्यासाठी केवळ तिच्या छतावर गेली नव्हती तर पाडण्यासही मदत केली होती, असे वक्तव्य प्रज्ञासिंहने केले आहे. यावर निवडणूक आयोगाने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याविरोधात तिला नोटीस पाठविली आहे. तसेच मध्य प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. एल. कांताराव यांनी सर्व राजकीय पक्षांना यापुढे अशी वक्तव्ये सुरु राहिल्यास कडक कारवाई करण्याची तंबी दिली आहे.
काय म्हणाली साध्वी?साध्वी प्रज्ञा सिंहने प्रचारावेळी एका टीव्ही चॅनेलवर बाबरी मशीदीवरून हे वक्तव्य केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राम मंदिराच्या मुद्द्याला वाचा फोडताना साध्वीने बाबरी मशीद पाडण्यासाठी मी मशीदीच्या छतावर चढले होते. वेकळ चढलेच नाही तर पाडायलाही मदत केली. राम मंदिर त्याच ठिकाणी बांधणार, असे तिने सांगितले आहे.