ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23- मी राज्यपाल झाल्यापासून माझा कोणताही पक्ष नव्हता. विकासाचं ध्येय मी नेहमी माझ्या डोळ्यासमोर ठेवलं होतं. त्याचप्रमाणे देशातील सर्वौच्च राष्ट्रपतिपद हे नेहमी कोणत्याही पक्षापेक्षा आणि राजकारणापेक्षा मोठं असलं पाहिजे आणि देशाचा विकास हे प्रमुख ध्येय असलं पाहिजे, असं मत एनडीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं आहे. शुक्रवारी रामनाथ कोविंद यांनी संसदेत राष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. भारताच्या विकासासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील. तसंच राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीसाठी मला ज्या पक्षांनी पाठिंबा दिला, त्यांचे मी आभार मानतो, असंही रामनाथ कोविंद म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएतील घटक पक्षांच्या उपस्थितीत कोविंद यांनी अर्ज दाखल केला. यावेळी संसदेमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं होतं. रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीला समर्थन देणारे एनडीएतील अनेक पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलं होतं पण उद्धव ठाकरे यावेळी गैरहजर होते.
राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. आतापर्यंत 27 उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 28 जून आहे. तर 1 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. यानंतर 17 जुलै रोजी मतदान होईल आणि 20 जुलै रोजी राष्ट्रपतींची घोषणा होणार आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून रामनाथ कोविंद यांचं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी नाव जाहीर करण्यात आलं होतं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली. भाजपकडून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी दलित चेहऱ्याला संधी दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. रामनाथ कोविंद यांच्या निवडीमुळे ही चर्चा खरी ठरली. भाजपचा दलित चेहरा अशी रामनाथ कोविंद यांची ओळख आहे. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांची नावे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी चर्चेत होती.
कोण आहेत रामनाथ कोविंद ?
रामनाथ कोविंद मूळचे उत्तरप्रदेशच्या कानपूरचे आहेत. कानपूरमधील पराऊंख गावात १ ऑक्टोबर १९४५ रोजी रामनाथ कोविंद यांचा जन्म झाला. पेशाने वकील असलेल्या कोविंद यांनी दिल्ली उच्च न्यायालयात काम केलं आहे. रामनाथ कोविंद १९७७ ते १९७९ या कालावधीत दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारचे वकील म्हणून कार्यरत होते. रामनाथ कोविंद यांनी १९९१ साली भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर तीनच वर्षांनी म्हणजेच १९९४ मध्ये कोविंद यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली. रामनाथ कोविंद भाजपकडून दोन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. १९९४ ते २००० आणि २००० ते २००६ हा कोविंद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ होता. ८ ऑगस्ट २०१५ रोजी कोविंद यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. भाजपच्या दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी रामनाथ कोविंद यांनी सांभाळली आहे. यासोबतच अखिल भारतीय कोळी समाजाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे.