- शरद यादव
(संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते)‘तुम अँग्री यंग मॅन हो, अच्छा बोलते हो, कांग्रेसी परिवार से हो, लेकिन गलत संगत में कैसे फंसे हो.’ असं आपुलकीनं विचारणाºया नेत्या आणि दुसरीकडे कठोर निर्णय घेणा-या पंतप्रधान अशा दोन्ही प्रतिमांच्या इंदिरा गांधी... त्यांच्यासारखा पंतप्रधान मी आतापर्यंत पाहिला नाही..!
देशात आतापर्यंत जेवढे पंतप्रधान झाले त्या सर्वांनी आपल्या ताकदीनुसार आणि कौशल्यानुसार देशाची सेवा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, यात इंदिरा गांधी यांचे योगदान सर्वांत मोठ्या उंचीचे आहे. माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात इंदिरा गांधी यांचा आणि काँग्रेस पक्षाचा विरोध करण्यानेच झाली आहे आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत मी त्यांचा कट्टर विरोधक आणि कटू टीकाकार राहिलो आहे. त्यामुळे मला जवळपास तीन वर्षे (आणीबाणीच्या काळात दीड वर्षे आणि नंतरची दीड वर्षे) तुरुंगात काढावी लागली आहेत. आणीबाणीच्या काळात त्यांनी प्रेस सेन्सॉरशिपसारखी लोकशाहीविरोधी पावले उचलली असली तरी आजही मला हे सांगण्यात कोणताही संकोच वाटत नाही की पंतप्रधान म्हणून त्यांनी आपल्या नेतृत्वाद्वारे भारतासाठी आणि अविकसित देशांसाठी जे काम केले ते अद्वितीयच आहे.इंदिरा गांधी यांचा आणि माझा परिचय १९७४ मध्ये झाला. जबलपूरमधून पोटनिवडणूक जिंकून मी लोकसभेत पोहोचलो होतो. लोकसभेचा सदस्य म्हणून जेव्हा शपथ घेतली, तेव्हा इंदिरा गांधी यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. लोकसभेत मी कायमच दलित आणि मागासवर्गीय, गरिबांचे प्रश्न उपस्थित करायचो. माझ्या या विषयांवरील प्रश्नांवर इंदिरा गांधी यांची बारीक नजर असायची. त्या ते लक्ष देऊन ऐकायच्या आणि त्यावर कार्यवाही करण्याचे आदेशही द्यायच्या. याच काळात त्यांना कोणा एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याकडून कळले की माझे पिताही स्वातंत्र्यसैनिक होते आणि होशंगाबाद जिल्ह्याच्या काँग्रेस कमिटीचे अध्यक्षही होते. हे कळल्यानंतर त्यांनी एके दिवशी संसदेतील त्यांच्या कक्षात मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्याशी चर्चा सुरू करताच, त्यांनी आत्मीयतेने विचारले, ‘‘तुम अँग्री यंग मॅन हो, अच्छा बोलते हो, कांग्रेसी परिवार से हो लेकिन गलत संगत में कैसे फंसे हो?’’ त्या वेळी वयाने, अनुभवानेही लहान होतो. संसदेतही नवीन होतो. त्यांच्या वाक्यावर मी नम्रतेने हसत नमस्कार केला अन् तिथून निघालो. या प्रसंगानंतर त्यांच्या भेटीचे अनेक प्रसंग आले. अनेक विषयांवर त्यांच्याविषयी आणि त्यांच्या पक्षाविषयी मतभेद असूनही आमच्यातील स्नेह कायम राहिला.पंतप्रधान होण्याअगोदर इंदिरा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होत्या. परंतु, त्या अत्यंत मितभाषी होत्या. अंतर्मुख होत्या. त्यामुळे त्यांची प्रतिमाही एक सामान्य मंत्र्यासारखीच होती. मात्र, लालबहादूर शास्त्री यांच्या आकस्मिक निधनानंतर त्या पंतप्रधान झाल्या. मितभाषी आणि अंतर्मुख अशा त्यांच्या प्रतिमेमुळे लोकनायक जयप्रकाश आणि डॉ. राममनोहर लोहिया यांनी त्यांचा उल्लेख ‘गुंगी गुडिया’ असा केला होता. त्याच काळात इतर राजकीय नेत्यांनी आणि विश्लेषकांनी त्यांच्या क्षमतांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, इंदिरा गांधी यांनी प्रयत्नपूर्वक आपली ही प्रतिमा बदलली. त्या कणखर नेत्या झाल्या.१९६६च्या जानेवारी महिन्यात पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर जवळपास एका वर्षातच त्यांना सार्वत्रिक निवडणुकांचा सामना करावा लागला. या निवडणुकीत अल्प बहुमताचे सरकार स्थापन करण्यात त्यांना यश आले. मात्र दुसºयांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी अशा काही धाडसी निर्णयांचा धडाका लावला ज्यांनी त्यांची मितभाषी ही प्रतिमाच बदलून गेली. देशाच्या चौदा खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण हा असा निर्णय होता ज्यामुळे ग्रामीण भागापर्यंत बँकिंग सेवा पोहोचली. बँकांमधील ४० टक्के भांडवल कृषी व छोट्या उद्योगांसाठी राखीव ठेवले गेले. या निर्णयामुळे त्यांची समाजवादी आणि गरिबांच्या कैवारी अशी प्रतिमा तयार झाली.त्यांनी आणीबाणी लागू केली तेव्हा तर त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला. देश-विदेशात त्यांना ‘हुकूमशहा’ संबोधले जाऊ लागले. त्या कधीच निवडणुका घेणार नाहीत, असेही सांगितले जाऊ लागले. मात्र इंदिरा गांधी कोणत्या मातीच्या बनल्या होत्या माहीत नाही, त्यांनी अनेकांची मते खोडून काढत निवडणूक घेतली. त्यात ऐतिहासिक पराभव स्वीकारला आणि लोकशाहीवर आपला विश्वास असल्याचेच दाखवून दिले. एवढेच नाही तर पुन्हा एकदा भरारी घेत, जनतेत जात त्यांनी केवळ अडीच वर्षांच्या काळात सत्ता मिळवली. त्यांच्यासारखा पंतप्रधान देशाला आतापर्यंत लाभलेला नाही. इंदिरा गांधी यांच्या देशसेवेला आणि साहसी नेतृत्वाला माझा सलाम!म्हणून देशात हरित क्रांतीइंदिरा गांधी यांनी जेव्हा सूत्रे हाती घेतली तेव्हा भारताला अन्नधान्याची देशातील गरज पूर्ण करण्यासाठी विदेशावर अवलंबून राहावे लागत होते. या संकटातून बाहेर पडण्यासाठी इंदिरा गांधी यांनी जोरदार प्रयत्न केले. याचा परिणाम असा झाला की देशात हरित क्रांती झाली. देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला आणि इतर देशांनाही धान्य निर्यात करू लागला.
(शब्दांकन : समीर मराठे)