“अदानी प्रकरणी चुकीचं बोललो नाही, गुगल करून पाहा;” नोटीसीनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 08:09 PM2023-02-13T20:09:28+5:302023-02-13T20:09:45+5:30
राहुल गांधी यांनी लोकसभेत उद्योगपती गौतम अदानी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता.
राहुल गांधी यांनी लोकसभेत उद्योगपती गौतम अदानी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. त्यानंतर अनेक वाद निर्माण झाल्याचे दिसून आले. त्या भाषणानंतर लोकसभेने राहुल गांधी यांना त्यांच्या असंसदीय वक्तव्याबद्दल नोटीसही बजावली आहे. आता राहुल यांनी त्या नोटीसवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “आपण संसदेत काहीही चुकीचे बोललो नाही, लोक हवे असल्यास गुगलही करू शकतात,” असे ते म्हणाले.
“काही दिवसांपूर्वी मी पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्यावर सभागृहात भाष्य केले होते. मी माझा मुद्दा अतिशय शांतपणे आणि नम्रपणे मांडला होता, कोणतीही वाईट भाषा वापरली नाही. माझ्या बाजूने फक्त काही तथ्ये मांडली गेली. मी सांगितले की अदानी पंतप्रधानांसोबत परदेश दौऱ्यावर कसे जायचे आणि नंतर त्यांना मोठे कंत्राट मिळत असे. विमानतळावरील 30 टक्के वाहतूक अदानींद्वारे कशी नियंत्रित केली जाते,” असे म्हणत आपले संपूर्ण भाषण एडिट केल्याचा दावा राहुल गांधींनी केला. अदानी आणि अंबानींबद्दल बोलणे हा पंतप्रधानांचा अपमान आहे असे आता दिसत असल्याचे ते म्हणाले.
… तेव्हाच भाषण हटवलं जातं
आता सदनातील एखाद्याच्या भाषणात तथ्य नसले तरच एखादी गोष्ट काढून टाकली जाते, असा युक्तिवाद राहुल यांनी केला आहे. मात्र आपल्या बाजूची सर्व विधाने वस्तुस्थितीच्या आधारे देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत आपल्याबद्दल खूप बोलले, पण ते असंसदीय वक्तव्य मानले जात नाही, यावरही राहुल यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
“पंतप्रधान म्हणतात माझे आडनाव गांधी का आणि नेहरू का नाही. म्हणजे पंतप्रधान थेट माझा अपमान करू शकतात, पण त्यांचे शब्द काढले जात नाहीत. याचा अर्थ सत्य बाहेर येणार नाही असे नाही. भाषणादरम्यान माझा चेहरा आणि पंतप्रधान मोदींचा चेहरा पाहिला असता. ते किती वेळा पाणी प्यायले, हात कसे थरथरत होते. त्यांना वाटते की ते शक्तिशाली आहेत आणि लोक त्यांना घाबरती,” असे राहुल गांधी यांनी नमूद केले.