नवी दिल्ली: अयोध्येतील राम मंदिर आणि मशिदीचा तिढा सुटला नाही, तर भारतात सीरियासारखी परिस्थिती उद्भवेल, या विधानाविषयी श्री श्री रविशंकर यांनी मंगळवारी स्पष्टीकरण दिले. माझ्या विधानात कोणतीही धमकीची भाषा नव्हती. मी केवळ चिंता व्यक्त केली होती, असे त्यांनी म्हटले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की, भारतात शांतता राहू द्या. आपल्या देशाचा सीरिया होता कामा नये. असं झालं तर मोठा अनर्थ होईल. अयोध्या हे मुस्लिमांचे धार्मिक स्थळ नाही. त्यामुळे मुस्लिमांनी येथील आपला दावा सोडून एक आदर्श निर्माण केला पाहिजे, असे श्री श्री रविशंकर यांनी म्हटले होते. त्यावर अनेकांनी टीका केली होती. श्री श्री रविशंकर हे राज्यघटनेला मानत नाहीत. त्यांचा कायद्यावर विश्वास नाही. रविशंकर हे स्वत:लाच कायद्यासमान मानतात. ते स्वत:ला एवढे मोठे समजतात की, इतरांनी नेहमी त्यांचे ऐकावे असे त्यांना वाटते. ते पक्षपाती आहेत, अशी टीका एमआयएमचे खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी केली होती. यावर स्पष्टीकरण देताना श्री श्री रविशंकर यांनी म्हटले की, मी स्वप्नातही एखाद्याला धमकी देण्याचा विचार करु शकत नाही. मी एवढेच म्हटले होते की, आपल्या देशात मध्यपूर्वेतील देशांप्रमाणे हिंसा होऊ नये. मला त्याची भीती वाटते, असे श्री श्री रविशंकर यांनी सांगितले.
अयोध्या प्रकरणात मी धमकी दिली नाही, फक्त भीती व्यक्त केली- श्री श्री रविशंकर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2018 3:05 PM