सूरत, दि. 8 - गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी मतदान सुरु आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल यांच्या उमेदवारीमुळे भाजपा आणि काँग्रेस दोघांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. गुजरातमधून अहमद पटेल यांचा राज्यभेत जाण्याचा मार्ग रोखण्यासाठी भाजपाने जोरदार फिल्डिंग लावली आहे तर, अहमद पटेल यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेसने आपली सर्व ताकत पणाला लावली आहे.
दरम्यान मतदान सुरु असतानाच शंकरसिंह वाघेला यांनी अहमद पटेल यांच्या पराभवाची भविष्यवाणी केली आहे. मी अहमद पटेल यांना मत दिलेले नाही. पराभूत होणा-या उमेदवाराला कोण मत देईल असे सूचक विधान त्यांनी केले. त्यामुळे अहमद पटेल यांच्या विजयाबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी अहमद पटेल यांना 45 मतांची आवश्यकता आहे. सध्या काँग्रेसकडे 44 आमदारांची मते आहेत. फक्त एक मत अहमद पटेल यांच्या जय-पराजयात महत्वपूर्ण ठरणार आहे.
अहमद पटेल हे काँग्रेस हायकमांडच्या मर्जीतले नेते म्हणून ओळखले जातात. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अशी त्यांची ओळख आहे. काँग्रेसमध्ये संघटनात्मक आणि विविध राज्यातील सत्तास्थापनेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.अहमद पटेल यांचा राज्यभेत जाण्याचा मार्ग रोखून वर्षअखेरीस होणा-या गुजरात विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसच्या मनोधैर्याचे खच्चीकरण करण्याची भाजपाची रणनिती आहे.
अहमद पटेल उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी आणि जदयूचा आमदार त्यांच्यासोबत होता. काँग्रेसच्या 51 आमदारांपैकी सात आमदार बंगळुरुला गेले नव्हते. हे आमदार वाघेल यांच्या गटातील असून त्यांच्यापैकी एक आमदार मदत करेल असा काँग्रेसला विश्वास आहे. 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत काँग्रेसचे 57 आमदार होते. त्यातील सहा आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ 51 झाले.